नांदेडमध्ये धक्कादायक घटना: पोलीस हेड कॉन्स्टेबलला लुटले, एक आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:37 IST2024-08-16T17:36:59+5:302024-08-16T17:37:10+5:30
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

नांदेडमध्ये धक्कादायक घटना: पोलीस हेड कॉन्स्टेबलला लुटले, एक आरोपी ताब्यात
नांदेड: वाघाळा भागात दोन अज्ञात चोरट्यांनी बीट पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय रामदिनेवार यांना धक्काबुक्की करून साडेतीन हजार रुपये हिसकावले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेमुळे सिडको-हडको परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सिडको- हडको या बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय रामदिनेवार हे १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी विष्णूपुरी, नांदेड येथील रूग्णालयातील कामकाज आटोपून त्यांच्या दुचाकीवर वाघाळा मार्गे ठाण्याकडे परत येत होते. दरम्यान, वाघाळा, नांदेड येथील विहाराजवळ १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात आरोपींनी साध्या गणवेशातील रामदिनेवार यांना धक्काबुक्की केली. याशिवाय, खिशातील रोख साडेतीन हजार रूपये बळजबरीने हिसकावून घेवून पळून गेले.
माहिती मिळताच पो. हे. कॉ. संतोष जाधव, पो. कॉ. माधव माने व बीट पोलीस अंमलदार संजय रामदिनेवार तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी पो. नि. नागनाथ आयलाने आणि पोउपनि. महेश कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील दोघांपैकी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी, अन्य एक आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.