धक्कादायक ! माहूर आगारात वाहकाने बसमध्येच घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 08:34 PM2021-02-27T20:34:38+5:302021-02-27T20:36:04+5:30

नादुरुस्त ईटीआयएममुळे कारवाईच्या धास्तीने पाऊल उचलल्याची चर्चा

Shocking! At Mahur depot, the conductor commits suicide in the bus | धक्कादायक ! माहूर आगारात वाहकाने बसमध्येच घेतला गळफास

धक्कादायक ! माहूर आगारात वाहकाने बसमध्येच घेतला गळफास

Next
ठळक मुद्देसुसाइड नोटमध्ये मांडली व्यथा

माहूर (जि. नांदेड) : नादुरुस्त ईटीआयएम मशीनमुळे तिकीट चुकीचे निघाले. वारंवार असे घडत असल्याने पुन्हा निलंबनाची कारवाई होईल, या धास्तीतून राज्य परिवहन मंडळाच्या वाहकाने बसमध्येच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर आगारात घडली.

संजय संभाजी जानकर (वय ५३) असे मृत वाहकाचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील वाघी येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
माहूर आगारात मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा हा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला. परळी-माहूर (क्र. एमएच २० बी.एल. ४०१५) ही बस माहूरच्या एसटी आगारात २५ फेब्रुवारी रोजी रात्री उभी केली होती. या बसची माहूरहून परळीकडे रवाना होण्याची वेळ सकाळी ७:३० ची आहे. शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास आगारातील स्वच्छता कर्मचारी बस स्वच्छ करण्यासाठी गेले असता, बसमध्ये वाहक संजय जानकर हे गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

आगारप्रमुख व्ही. टी. धुतमल यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहूरचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे हलविण्यात आला. या वाहकाच्या गाडीची तपासणी पथकाने २४ रोजी धनोडा येथे केली होती. त्यावेळी काही प्रवाशांचे तिकीट निघाले नसल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी कारवाई होण्याच्या भीतीतूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा असून आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून ती त्याने माहूर आगार व्हॉट्स ॲप ग्रुपवर शुक्रवारी पहाटे ४ वाजता टाकल्याचेही पुढे आले आहे. तो तुटपुंज्या पगारामुळे नेहमी आर्थिक विवंचनेत असायचा, तसेच यापूर्वीही त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती, अशी माहिती हाती आली आहे.

सुसाइड नोटमध्ये मांडली व्यथा
वाहक संजय जानकर याने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली असून त्यामध्ये, तिकीट यंत्राचा वाहकांना कसा फटका सोसावा लागतो, याबाबतची व्यथा मांडली आहे. यात म्हटले आहे की, राज्यभरातील एसटीचे वाहक नादुरुस्त ईटीआयएम मशीनद्वारे आपली कामगिरी बजावत आहेत. खोट्या अहवालाने निलंबित व सेवेतून बडतर्फ होत आहेत. मी २४ रोजी माहूरवरून महागावसाठी साडेतीन प्रवासी घेतले. मात्र, यंत्रातील बिघाडामुळे साडेतीनऐवजी एक तिकीट प्रिंट झाले. तेही अपंगांसाठी असलेले तिकीट बाहेर आले. हा प्रकार सुरू असतानाच, धनोडापर्यंत गाडी पोहोचली आणि पथकाने तिकीट तपासणी सुुरू केली. याप्रकरणी माझ्यावर केस दाखल झाली. मला निलंबितही केले जाईल. मात्र, मशीन योग्य असती, तर तिकीट योग्य निघाले असते.

सत्यता समोर येईल
वाहक संजय जानकर यांच्या ताब्यातील ट्रायमॅक्स कंपनीचे तिकीट यंत्र जप्त करून सील करण्यात आले आहे. या कंपनीचा सुपरवायझर, माहूर आगारप्रमुख आणि महामंडळाचा निरीक्षक, अशा तिघाजणांच्या पथकाकडून या यंत्राची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सत्यता समोर येईल.
- संजय वावळे, विभागीय वाहतूक अधिकारी, नांदेड

मशीनचा त्रास वाहकांना होतो
खराब ईटीआय मशीनचा त्रास वाहकांना होतो. त्यांच्यावर कारवाई केली जाते. आज याच कारणामुळे आमचा एक सहकारी गेला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
- संदीप शिंदे, अध्यक्ष,एसटी कामगार संघटना

Web Title: Shocking! At Mahur depot, the conductor commits suicide in the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.