धक्कादायक! कोर्टातून कारागृहात नेताना कैद्याजवळ सापडला गांजा
By शिवराज बिचेवार | Published: February 28, 2024 05:44 PM2024-02-28T17:44:02+5:302024-02-28T17:45:23+5:30
नांदेडला पोहचल्यानंतर कारागृहाच्या आत सोडताना कैद्यांची कसून तपासणी केली जाते.
नांदेड : भोकर येथील न्यायालयात दरोड्याच्या गुन्ह्यात तारखेसाठी नेल्यानंतर पोलिसांनी कैद्याला परत कारागृहात आणले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात गांजाची पुडी आढळून आली. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे कैद्याला कुटुंबीयांनी जे कपडे दिले होते, त्यात हा गांजा होता.
२७ फेब्रुवारी रोजी उमरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी शेख सोहेल शेख रज्जाक (रा. देगलूर नाका) याला पोलिस उपनिरीक्षक प्रकाश आवडे आणि सहकाऱ्यांनी तारखेसाठी भोकर न्यायालयात नेले होते. न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर परत ते शेख सोहेल याला नांदेड कारागृहात सोडण्यासाठी निघाले होते. यावेळी शेख सोहेल याच्या कुटुंबीयांनी त्याला काही कपडे दिले. नांदेडला पोहचल्यानंतर कारागृहाच्या आत सोडताना कैद्यांची कसून तपासणी केली जाते. पोलिसांनी शेख सोहेल याच्याकडे असलेल्या कपड्यांची तपासणी केली. त्यात एका पॅन्टच्या खिशात गांजाची पुडी आढळून आली. या प्रकरणात पोउपनि. प्रकाश आवडे यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी शेख सोहेल याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि. राजू वटाणे हे करीत आहेत.