धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यात ११ महिन्यांत शेतकरी आत्महत्येने गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 05:07 PM2019-11-15T17:07:41+5:302019-11-15T17:10:49+5:30
अतिवृष्टीची मदत तातडीने मिळण्याची गरज
नांदेड : मागील अनेक वर्षापासून शेतकरी अडचणींचा सामना करीत आहे. त्यातच बदलत्या निसर्गचक्राचा फटकाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. यातूनच नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने आर्थिक विवंचनेतून तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मागील ११ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल १०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती खुद्द प्रशासनाच्या आकडेवारीवरुनच पुढे आली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील या १०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील ७५ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे मदत मिळाली आहे. तर ११ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यासाठीचे ५ प्रस्ताव प्रशासनाने सादर वरिष्ठांकडे सादर केले होते. यापैकी २ प्रस्ताव अपात्र ठरले. तर तिघांना मदत देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यामध्ये १० पैकी ९ प्रस्ताव पात्र ठरले तर १ अपात्र ठरला. मार्चमध्ये १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी शासनाने ७ जणांच्या कुटुंबियांना मदत केली. तर तिघे जण अपात्र ठरले.
एप्रिलमध्ये २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या तिन्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाने मदत केली आहे. मे महिन्यामध्ये १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ११ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. तर एक प्रस्ताव अपात्र करण्यात आला. जून महिन्यात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सर्वच्या सर्व प्रस्ताव प्रशासनाने आर्थिक मदतीसाठी मंजूर केले आहेत. जुलै महिन्यात ११ तर आॅगस्ट महिन्यात १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सप्टेंबर महिन्यात ९, आॅक्टोबर महिन्यात ७ तर नोव्हेंबर महिन्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरात आढळते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार अस्तित्वात येवून अतिवृष्टीच्या अनुषंगाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र नवे सरकार अस्तित्वात येण्याऐवजी राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने वेळेत मदत मिळते की नाही, याबाबत शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यपालांना पत्र
यंदा सुरुवातीलाच पाऊस कमी पडला. त्यामुळे उशिरा पेरण्या झाल्या. काही ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागल्या. नंतर परतीच्या पावसाने जे पीक आले होते तेही हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना इतर कोणतेही साधने नसल्यामुळे त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. रबी पेरण्या कशा करायच्या? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. खत, बियाणांचे भाव वाढले आहेत. घेतलेले कर्ज कसे फेडायचे ? अशा प्रश्नात शेतकरी आडकला आहे. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात शासनाने ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांची मदत करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात राष्टÑपती राजवट असल्याने राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र पाठविण्यात आले आहे.
- इंजि. द. मा. रेड्डी, अध्यक्ष, मराठवाडा जनता परिषद औरंगाबाद