धक्कादायक; नांदेड जिल्हा परिषदेचा ८२ कोटींचा निधी अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:41 AM2020-06-18T10:41:04+5:302020-06-18T10:43:38+5:30
निधी अखर्चित राहिल्याने परत करण्याची नामुष्की नांदेड जिल्हा परिषदेवर ओढवली आहे.
नांदेड: विविध विकासकामांसाठी २०१८-१९ मध्ये प्राप्त झालेल्या निधीपैकी तब्बल ८२ कोटी १३ लाखाचा निधी अखर्चित राहिल्याने परत करण्याची नामुष्की नांदेड जिल्हा परिषदेवर ओढवली आहे.
२०१८-१९ या वर्षात जिल्हा परिषदेच्या विविध विभागासाठी ८२९ कोटी ५७ लाखाचा निधी वेतन, भत्या साठी प्राप्त झाला होते. त्यातील ७८४ कोटी ३७ लाख खर्च झाले असून, ४५ कोटी २० लाख रुपये अखर्चित राहिले आहेत.
तर विविध योजना तसेच विकासकामांसाठी २९९ कोटी ९७ लाख प्राप्त झाले. यातील २५३ कोटी ९ लाख रुपये खर्च करण्यात आले. तर ३४ कोटी ४५ लाख रुपये अखर्चित राहिले. अखर्चित राहिलेल्या ८२ कोटी १३ लाखामध्ये ७९ कोटी ६५ लाख रुपये २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील तर २ कोटी ४८ लाख रुपये २०१९-२०२० या वर्षातील आहेत.
सर्वाधिक १४ कोटी १९ लाख समाजकल्याण विभागाचे अखर्चित आहेत. तर कृषी विभाग ३ कोटी ७० लाख, पशुसंर्वधन विभाग ११ लाख, लघु पाटबंधारे विभाग ५ कोटी ९८ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ३८ लाख, आरोग्य विभाग २ कोटी १६ लाख, शिक्षण विभाग २ कोटी ८५ लाख, बांधकाम दाक्षिण विभाग ८५ लाख, बांधकाम उत्तर विभाग २३ लाख, तर महिला व बांधकाम विभागाचा ४ कोटी १ लाखाचा निधी अखर्चित राहिला आहे.