नांदेडचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत; परिसरातील डुकरांच्या हल्ल्यात रुग्णाचा मृत्यू
By शिवराज बिचेवार | Published: November 11, 2023 02:53 PM2023-11-11T14:53:40+5:302023-11-11T14:54:43+5:30
डुकरेच उठली जिवावर; या घटनेने रुग्णालय परिसरातील डुकरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
नांदेड - २४ तासात २४ रुग्णांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडालेल्या विष्णुपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात जेवण करून झाडाखाली विश्रांती घेत असलेल्या एका रुग्णाचे डुकराच्या कळपाने लचके तोडले. त्यातच या रुग्णाचा मृत्यू झाला. कमरेच्या खालचा भाग, दोन्ही गाल आणि नाकाचा भाग या डुकरांनी फस्त केला होता. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतरही पुन्हा तो रुग्णालयात जेवण करण्यासाठी आला होता. या घटनेने रुग्णालय परिसरातील डुकरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे (३५) याला गेल्या अनेक वर्षांपासून टीबीचा आजार होता. त्याच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार घेवून तो बराही झाला होता. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर त्याचे वडील नागोराव कसबे हे त्याला धनगरवाडी येथील आपल्या गावी घेवून गेले होते. १० नोव्हेंबर रोजी तुकाराम हा परभणी येथील काकाकडे जाण्यासाठी निघाला होता. त्याला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वडिलांनी नांदेड रेल्वे स्टेशनवर सोडले होते. परंतु तो परभणीला न जाता परत विष्णुपुरी येथील रुग्णालयात गेला होता. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेले जेवणही त्याने केले. त्यानंतर परिसरातील चिंचेच्या झाडाखाली झोपला होता. त्यातच रात्रीच्या वेळी डुकरांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात तुकाराम यांच्या दोन्ही गालाचे, नाकाचे आणि कमरेखालच्या भागाचे लचके तोडण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही गंभीर बाब उघडकीस आली. त्यानंतर नागोराव कसबे यांनी रुग्णालयात धाव घेतली. नांदेड ग्रामीण पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
डुकरेच उठली जिवावर
शासकीय रुग्णालय परिसरात शेकडोंच्या संख्येने डुकरांची संख्या आहे. अनेकवेळा ही डुकरे रुग्णालयाच्या कक्षातही घुसतात. बाहेर थांबलेल्या नातेवाईकांवरही हल्ले करतात. रुग्णालयातील जैवकचरा हेच यांचे प्रमुख अन्न बनले आहे. त्यातून ते आणखी आक्रमक झाल्याचे यापूर्वीही दिसून आले होते. रुग्णालय प्रशासनाने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.