धक्कादायक! नांदेडमध्ये ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावे पीएम किसानचे अनुदान

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: October 5, 2023 05:25 PM2023-10-05T17:25:56+5:302023-10-05T17:26:47+5:30

पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी आणि आधार सीडिंग करणे अनिवार्य आहे.

Shocking! PM Kisan grant in favor of 8900 dead farmers in Nanded | धक्कादायक! नांदेडमध्ये ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावे पीएम किसानचे अनुदान

धक्कादायक! नांदेडमध्ये ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावे पीएम किसानचे अनुदान

googlenewsNext

नांदेड : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेमध्ये जिल्ह्यातील तब्बल ८९०० मयत शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात ५१ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने पीएम किसान योजनेतील हा गोंधळ पुढे आला आहे. एकीकडे पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी अल्पभूधारक, कास्तकारांची धडपड सुरू असताना दुसरीकडे मयत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ५ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होत असल्याचे समोर आले आहे.

पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी आणि आधार सीडिंग करणे अनिवार्य आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक जिल्ह्यात ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसानच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. २७ जुलै २०२३ रोजी ८५ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये हस्तांतरित केले. या योजनेत १८ हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. पण लाखो शेतकऱ्यांना ई-केवायसी नसल्याने हप्ता मिळाला नाही. लाभ मिळावा, यासाठी शासनाने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिलेली आहे.

तालुकानिहाय मयत शेतकरी संख्या
जिल्ह्यात पीएम किसान योजनेच्या यादीतील तालुकानिहाय मयत शेतकरी- उमरी ३२६, नांदेड ५१६, माहूर ४८१, अर्धापूर ३१७, देगलूर १०४६, हदगाव ७१४, कंधार ९६८, बिलोली ३९१, किनवट १४५३, भोकर ३५९, धर्माबाद २९०, नायगाव ५३३, मुखेड ४४२, लोहा ३०१, हिमायतनगर ३८१, मुदखेड ३८८ याप्रमाणे ८९०६ मृत शेतकऱ्यांची संख्या आहे.

तत्काळ ई-केवायसी करावी
मयत लाभार्थ्यांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळण्यासाठी पोर्टलवर अपलोड करून अपात्र लाभार्थी वगळण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्या लाभार्थ्याने ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी, जेणेकरून पंधरावा हप्ता लवकरात लवकर मिळेल.
- विजय बेतीवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी, नांदेड

Web Title: Shocking! PM Kisan grant in favor of 8900 dead farmers in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.