धक्कादायक ;अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे नांदेडमध्ये मसाल्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:29 PM2020-01-03T15:29:57+5:302020-01-03T15:31:04+5:30
अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे हळद पावडर, कस्तुरी मेथी, धनिया पावडर आदी प्रकारच्या मसाले पदार्थांची पॅकिंग करून ती विक्री केली
नांदेड : शहरात अस्तित्वात नसलेल्या विविध कंपन्यांच्या नावे मसाले पदार्थांची पॅकिंग करून विक्री करणाऱ्या श्रीकृष्णा फुडस् या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली़ या कारवाईत मसाले पदार्थांसह इतर साहित्य असा जवळपास ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली़
नांदेड शहरातील जुना कौठा भागात असलेल्या वृंदावननगर येथील श्री कृष्णा फुडस्चे मालक नंदकिशोर कमलकिशोर झंवर हे अस्तित्वात नसलेल्या विविध कंपन्यांच्या नावे मसाले पदार्थांची पॅकिंग करून विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती़ त्यानूसार अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांच्यासह पथकाने गुरूवारी जुना कौठा भागातील श्री कृष्णा फुडस् येथे धाड टाकून तेथून विविध बँ्रडच्या नावे असलेले मसाले पदार्थ जप्त केले़ यावेळी प्रभात बॅ्रंड, महेश फुड्स कंपनी आदी नावाने असलेले धनिया पावडर, कस्तुरी मेथी, हळद पावडर आदी जप्त करण्यात आले़
ज्या नावाने मसाले पदार्थ पॅकिंग करून विक्री केले जात होते़ त्या नावाच्या कंपन्या नांदेड शहरात अस्तित्वातच नसल्याची बाब तपासात पुढे आली आहे़ त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी विविध पदार्थांची नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ सदर कारवाईमध्ये जवळपास ६९ हजार ५६० रूपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे़
दुकानदारांसह ग्राहकांची फसवणूक
नांदेड शहरात अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे हळद पावडर, कस्तुरी मेथी, धनिया पावडर आदी प्रकारच्या मसाले पदार्थांची पॅकिंग करून ती विक्री केली जात आहे़ दुकानदारांना जास्तीचे कमिशन अथवा एकावर एक फ्री अशाप्रकारच्या स्कीम देऊन माल द्यायचा आणि तो दुकानदारांमार्फत ग्राहकांच्या माथी मारायचा, असे अनेकांचे उद्योग सुरू असल्याचा संशय आहे़ दुकानदारांनी आपण विक्री करीत असलेला ब्रँड, मालाची कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असे आवाहन अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी केले़