धक्कादायक ! मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत शिजला साप; ८० विद्यार्थी बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:00 PM2019-01-31T14:00:40+5:302019-01-31T14:10:28+5:30
खिचडी शिजविणाऱ्या महिलांच्या व शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला़
हदगाव (जि. नांदेड) : तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी खिचडीमध्ये चक्क साप आढळला़ एका विद्यार्थ्याच्या ताटात साप आल्याने त्याने ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे ८० विद्यार्थ्यांचा जीव वाचला़ खिचडी शिजविणाऱ्या महिलांच्या व शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला़
गारगव्हाण जि़ प़ शाळेत ३० जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे शाळेच्या प्रांगणातील किचनशेडमध्ये खिचडी शिजविण्यात आली़ दुपारी १ वाजता शाळा सुटल्यानंतर मुले खिचडी घेण्यासाठी रांगेत उभे राहिले़ अंजली जाधव, अभिषेक सुरोशे, कृष्णा तांबारे या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली़ यावेळी कृष्णा तांबारे या विद्यार्थ्याच्या ताटातच खिचडीमध्ये शिजलेला साप दिसून आला़ त्याने तो संबंधित महिलेस दाखविला़ त्यांनी लगेच साप चुलीमध्ये फेकला़ तसेच खिचडी मुलांच्या हातातून परत घेत आज खिचडी नाही म्हणून सांगितले़ नंतर शिजवलेली खिचडी फेकून दिली.
शाळेत खिचडी न दिल्यामुळे विद्यार्थी घरी गेले़ त्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला़ त्यांनी शाळेत जाऊन जाब विचारला़ खिचडी शिजविणारी महिला लताबाई कैलास सावतकर यांनी पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शिक्षकांनी सापच असल्याचे कबूल केले़ संबंधित खिचडी तपासत नसल्याचे यातून दिसून आले. तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी कित्येक दिवसांपासून धुतली नसल्याने पालकांनी मुख्याध्यापक प्रवीण बडेराव यांच्याविरोधसात संताप व्यक्त केला.
शाळेच्या कारभाराबद्दल संताप
गारगव्हाण येथील जि़ प़ शाळेची इमारत जुनीच असून शाळा शेतामध्ये आहे़ शाळेत १०१ विद्यार्थीसंख्या आहे़ शाळेत ४ शिक्षक आहेत़ त्यापैकी दोन शिक्षक रजेवर होते़ उपस्थित शिक्षकांनी किचनशेडमध्ये जाऊन खिचडी खाऊन पाहण्याची काळजी घेतली नसल्याचे उघड झाले़ त्या विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे ८० विद्यार्थी बालंबाल बचावले़ अनेक पालकांनी यावेळी शाळेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला़ याप्रकरणी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांनी कोणतेही गांभीर्य बाळगले नसल्याचे सांगण्यात आले़