मोठा खुलासा! हरियाणात पकडलेले चार दहशतवादी होते नांदेड मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 08:45 PM2022-05-09T20:45:45+5:302022-05-09T20:50:41+5:30
नांदेड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दहशत असलेला बब्बर खालसा या संघटनेचा हरविंदरसिंघ रिंदा हा पाकिस्तानात लपून बसला आहे.
नांदेड : काही दिवसांपूर्वीच हरियाणातील कर्नाल येथे पोलिसांनी चार दहशतवाद्यांना स्फोटकासह पकडले आहे. हे दहशतवादी कुख्यात हरविंदरसिंघ रिंदाचे साथीदार असून, पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा ते नांदेडला आणणार होते, अशी माहिती पुढे आली होती. विशेष म्हणजे मार्च महिन्यात तब्बल चार दिवस हे दहशतवादी नांदेड मुक्कामी होते. त्यानंतर बिदरमार्गे गोव्याला गेले होते, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दहशत असलेला बब्बर खालसा या संघटनेचा हरविंदरसिंघ रिंदा हा पाकिस्तानात लपून बसला आहे. पाकिस्तानातून तो ड्रोनच्या साह्याने शस्त्रे पाठवित आहे. त्याने स्फोटके आणि पाठविलेली शस्त्रे घेऊन त्याचे साथीदार गुरुप्रित, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर हे नांदेडकडे वाहनातून येत असताना कर्नाल पोलिसांनी त्यांना पकडले. रोबोटद्वारे त्यांची गाडीची झडती घेऊन शस्त्रसाठा जप्त केला. या घटनेनंतर नांदेड शहर व जिल्ह्यात रिंदाशी संबंधित असलेल्या अनेकांची पोलिसांनी झाडाझडती घेतली.
त्यातच पकडलेले हे आरोपी मार्च महिन्यात नांदेडात चार दिवस मुक्कामी असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ३० मार्च ते २ एप्रिलपर्यंत हे चारही दहशतवादी नांदेडात होते. त्यानंतर बिदरमार्गे ते पुढे गाेव्याला गेले असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही दुजाेरा दिला आहे. त्यामुळे हे दहशतवादी हरियाणात जाण्यापूर्वी नांदेडात नेमके कशासाठी थांबले होते? याचा तपास पोलीस करीत आहेत; परंतु खलिस्तानी कारवायांसाठी दहशतवाद्यांना नांदेड हे सेफ झोन आहे काय? अशी शंका आता येत आहे.
चार दिवसांत कोणाला भेटले?
कर्नाल पोलिसांनी पकडलेले चार दहशतवादी चार दिवस नांदेडात होते; परंतु याची खबर कोणत्याच यंत्रणेला नव्हती. हे चारही जण या काळात कोणा-कोणाला भेटले? नांदेडात नुकत्याच घडलेल्या बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येशी या दहशतवाद्यांचा काही संबंध आहे काय? याची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहेत.