खळबळजनक! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोलिसाला धक्का देऊन पाडलं, बाईक नेली पळवून
By शिवराज बिचेवार | Published: June 27, 2023 06:53 PM2023-06-27T18:53:13+5:302023-06-27T18:53:36+5:30
या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड : विष्णुपुरी रस्त्यावर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याला थांबविले. कर्मचारी पत्ता सांगत असताना, त्यांना ढकलून देऊन त्यांच्याजवळील दुचाकी चोरट्यांनी लांबविली. ही घटना २५ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धर्माबाद पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोहेकॉ.उद्धव माराेतराव मुंडे हे २५ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाहुण्यांना सोडण्यासाठी राजश्री पब्लिक स्कूल परिसरात गेले होते. पाहुण्यांना सोडल्यानंतर ते विष्णुपुरी ते लातूर फाटा या रस्त्याने येत होते. त्याच वेळी एक जण त्यांच्या दुचाकीसमोर आला. मुंडे यांना त्याने विष्णुपुरीकडे जाणारा रस्ता कोणता आहे, असे विचारले.
त्यावर मुंडे यांनीही माणुसकीच्या नात्याने सरळ रस्ता असून, दोन किलोमीटरवर विष्णुपुरी असल्याचे सांगितले. त्याच वेळी आरोपीने मुंडे यांच्या दुचाकीची चावी काढून त्यांना ढकलून दिले. त्यामुळे मुंडे खाली पडले. तेवढ्याच वेळात आरोपीने मुंडे यांची दुचाकी घेऊन पळ काढला. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि.पाटील हे करीत आहेत.