धक्कादायक! अर्धापूर तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 07:27 PM2023-05-24T19:27:07+5:302023-05-24T19:27:18+5:30
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा व बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड) : शेतीवर येणारी सततची संकटे यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या विवांचनेत सापडलेल्या अर्धापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. एकाच दिवशी दोन घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गारपीट, हवामानातील बदल, नापिकी, वादळी वारे विविध रोगांचा प्रादुर्भाव अवकाळी पाऊस आदी मुळे शेतातील पिकाचे नुकसान, नेहमीच घाट्यात येत असलेली शेती, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा व बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत सापडलेल्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव व बारसगाव येथील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पिंपळगाव महादेव येथील साहेब व्यंकटराव देशमुख (वय ५७) या अल्पभूधारक शेतकऱ्याने अस्मानी संकटामुळे शेतीचे सतत होणारे नुकसान व भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड चे डोक्यावर असलेले कर्ज या विवंचनेत शेतकऱ्याने बौध्द स्मशानभूमी परिसरात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. गेल्या आठ दिवसांपासून देशमुख हे तणावाखाली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील बजरंग शिवराज बारसे वय ४९ वर्ष हे होमगार्ड असून नोकरीसह शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांची बारसगाव शिवारात गट नंबर ८९ मध्ये दोन एकर शेती मयताचे वडील शिवराज बारसे यांच्या नावे असून या शेतीवर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अर्धापूर चे ३ लाख २० हजार रुपये कर्ज असल्याने व सततच्या अस्मानी संकटामुळे तोट्यात येत असलेली शेती यामुळे कर्ज कसे फेडावे व कुटुंबाचा उद्धार निर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत बजरंग शिवराज बारसे यांनी दि.२४ बुधवार रोजी दुपारी औषध प्रशासन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
तालुक्यातील दोन्ही ठिकाणी आत्महत्या केलेल्या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पाटील व संतोष सूर्यवंशी यांनी पंचनामा करून मयतांचे शव पुढील प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविले सदर प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.