श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी संस्थेची देशपातळीवर चौथ्या क्रमांकावर झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:26 PM2020-08-19T13:26:52+5:302020-08-19T13:29:01+5:30
नांदेडच्या श्री गुरूगोविंदसिंघजी महाविद्यालयाने देशपातळीवर आपल्या शैक्षणिक कामगिरीच्या बळावर गरूडझेप घेतली आहे़
नांदेड : केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अटल इनोव्हेशन अॅचिव्हमेंट इन्स्टिट्यूट रँकिंग (एआरआयआयए) २०२० मध्ये येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र या संस्थेने देशपातळीवर चौथे नामांकन पटकावले आहे़ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी १८ ऑगस्ट रोजी हे देशपातळीवरील मानांकन जाहीर केले.
देशपातळीवरील महाविद्यालये, विद्यापीठ व स्वायत्त संस्था २०१८ पासून या नामांकनासाठी नावीन्य आणि उद्योजकता क्षेत्रात वर्षभर केलेल्या कामगिरीसाठी कार्यरत असतात़ या नामांकनासाठी देशभरातील ६७४ संस्थांनी वेगवेगळ्या गटात सहभाग नोंदविला होता़ केंद्रीय अनुदानित संस्था जसे की- आयआयटी, एनआयटी, शासकीय विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शासकीय शिक्षण संस्था, अनुदानित शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण संस्था आणि केवळ महिलांसाठीच्या शिक्षण संस्था अशा विविध संस्थांना हे मानांकन देण्यात आले होते़
नांदेडच्या श्री गुरूगोविंदसिंघजी महाविद्यालयाने देशपातळीवर आपल्या शैक्षणिक कामगिरीच्या बळावर गरूडझेप घेतली आहे़ मिनिस्ट्री आॅफ ह्यूमन रिचर्स डेव्हलपमेंटअंतर्गत इनोव्हेशन कौन्सिल महाविद्यालयास स्थापन करण्यास सांगण्यात आले होते़ महाविद्यालयात दोन वर्षांपूर्वी हे कौन्सिल स्थापन करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापकांसह उद्योग क्षेत्रातील मान्यवरही सहभागी आहेत़ या कौन्सिल द्वारे नवनवीन प्रोजेक्ट राबविले जातात़ ‘बहा’ या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत महाविद्यालयाने सहभाग घेतला होता़ मार्च महिन्यात ही स्पर्धा पार पडली़ या स्पर्धेत सर्व ठिकाणी चालणारे एक चारचाकी वाहन डिझाईन करायचे होते़ या नाविन्यपूर्ण प्रकल्पात महाविद्यालयाला देशातील पहिले ५ लाख रूपयांचे पारितोषिक मिळाले होते़
याबरोबरच संस्थेतील विद्यार्थ्यांनी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट इंडिया’, हॅकॅथॉन या स्पर्धेतही लक्षवेधी यश मिळविले असून महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रयोग तसेच उपक्रमासाठी पेटंट आणि कॉपीराईटसुद्धा मिळविले आहेत़ संस्थेचे संचालक प्रा़ यशवंत जोशी यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, समन्वयक डॉ़ सुहास गाजरे, मुरली मोहन यांचे स्वागत केले़
अभिमानास्पद बाब आहे़
देशपातळीवर एआरआयआयएमध्ये चौथा क्रमांक मिळविला ही अभिमानास्पद बाब आहे़ लोकांची संस्थेबद्दल, तसेच या भागाबद्दल जी मागासपणाची भावना आहे, ती या नामांकनामुळे नक्कीच कमी होऊन नांदेडसारख्या ठिकाणी राहूनही आपण देशपातळीवर यश मिळवू शकतो, हेच या नामांकनाने सिद्ध केले आहे़.
- प्रा़ यशवंत जोशी, संचालक, श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था, नांदेड