यात्रेसाठी श्रीक्षेत्र माळेगाव सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:32 AM2017-12-16T00:32:55+5:302017-12-16T00:33:06+5:30
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा १६ डिसेंबरपासून सुरु होत असून या ठिकाणी भाविक, यात्रेकरु, व्यापारी यांच्या सुविधांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व तयारी केली आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्षा शांताबाई पाटील जवळगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा १६ डिसेंबरपासून सुरु होत असून या ठिकाणी भाविक, यात्रेकरु, व्यापारी यांच्या सुविधांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व तयारी केली आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्षा शांताबाई पाटील जवळगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी दिली.
माळेगाव यात्रेच्या संदर्भात शुक्रवारी पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पाच दिवस चालणाºया माळेगाव यात्रेतील भरगच्च कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय पूजा होणार असून दुपारी दोन वाजता देवस्वारी व पालखीपूजन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, पालकमंत्री अर्जुन खोतकर, आ. अमिता चव्हाण व जि.प. अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी दुपारी दोन वाजता ग्रामीण महिला व बालकांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शांताबाई पवार या राहणार आहेत. सभापती मधुमती देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी भव्य कृषीप्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकºयांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी सभापती लक्ष्मण रेड्डी हे राहणार आहेत. तर जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
१७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विविध स्पर्धांचे उद्घाटन समाजकल्याण सभापती शीला निखाते यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पशु, अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आ. श्रीनिवास गोरठेकर यांच्या हस्ते होणार आहे. १८ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण सभापती मिसाळे गुरुजी तर उद्घाटक म्हणून जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव हे राहणार आहेत.
१९ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता लावणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर हे राहणार असून आ. अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
२० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पारंपरिक लोककला महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आ. प्रताप पाटील चिखलीकर हे राहणार आहेत.
या यात्रेची सांगता बक्षीस वितरण सोहळ्याने दुपारी चार वाजता होणार आहे. पत्रकार परिषदेला जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण सभापती मिसाळे गुरुजी, कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, समाजकल्याण सभापती शीला निखाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोंढेकर आदींची उपस्थिती होती.
यात्रेकरुंसाठी मूलभूत सुविधांची सोय
माळेगाव येथील रस्त्यांची दुरुस्ती तसेच यात्रेच्या ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून पाणीपुरवठ्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. यात्रेच्या काळात दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच यात्रा परिसरात ठिकठिकाणी एलसीडी बसविण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी केली आहे. औषधीसाठा ठेवण्यात आला आहे. पशुधनाची काळजी घेण्यासाठी पथक तैनात केले आहे. शौचालयांची तात्पुरती व्यवस्था केली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी दिली.