श्रीमंत शाहू महाराजांनी स्वीकारले निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:08 AM2018-10-13T01:08:51+5:302018-10-13T01:09:06+5:30
थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या नांदेड येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी राजर्षी शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापालिकेने निमंत्रित केले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या नांदेड येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी राजर्षी शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापालिकेने निमंत्रित केले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
महापालिकेच्यावतीने शहरातील काबरानगर परिसरात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे़ सध्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम जोरात सुरू आहे़
शुक्रवारी आ. डी़ पी़ सावंत यांच्यासह महापौर शीलाताई भवरे आणि मनपा शिष्टमंडळाने कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना निमंत्रण दिले आहे़ त्यांनी सदर निमंत्रण स्वीकारल्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरणसोहळा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार, हे आता निश्चित झाले आहे.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार माजी पालकमंत्री आ. डी. पी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे जावून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची आज भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी नांदेड येथे उभारण्यात आलेल्या थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी आमंत्रण दिले.
त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून पुढील काही दिवसांत होणाऱ्या या सोहळ्यासाठी येण्याचे मान्य केले आहे. त्यासोबतच कोल्हापूर येथे वास्तव्यात असलेले राजर्षी शाहू महाराज चरित्राचे गाढे अभ्यासक व थोर इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित केले असून त्यांनीही निमंत्रण स्वीकारले आहे.
मनपातर्फे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये आ. डी. पी. सावंत यांच्यासमवेत माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, महापौर शीलाताई भवरे, उमहापौर विनय गिरडे पाटील, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, कोल्हापूरचे नगरसेवक तोफीक मुलाणी यांचा समावेश होता.