तामशातील कोट्यवधींच्या भूखंडाचे श्रीखंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:15 AM2018-05-03T01:15:34+5:302018-05-03T01:15:34+5:30
तामसा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सुमारे ८ एकर जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचा सपाटा तामसा ग्रामपंचायतने चालविला आहे़ अनेकांनी कोट्यवधी रुपयांची ही जमीन स्वत:च्या खिशात घातली़ जिल्हा तथा तालुका प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : तामसा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सुमारे ८ एकर जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचा सपाटा तामसा ग्रामपंचायतने चालविला आहे़ अनेकांनी कोट्यवधी रुपयांची ही जमीन स्वत:च्या खिशात घातली़ जिल्हा तथा तालुका प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे़
कै़शंकरराव चव्हाण राज्याचे पाटबंधारेमंत्री असताना १९६४ मध्ये त्यांच्या हस्ते तामसा सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना झाली होती़ तामसा येथे मोठी बाजारपेठ तथा कापसाचे उत्पादन जास्त असल्याने कापूस उत्पादकांना फायदा होईल, नागरिकांना बाजारपेठ उपलब्ध होईल या हेतूने जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना झाली होती़ या जिनिंगला त्यावेळी वैभव प्राप्त झाले होते़ तामसा ग्रामपंचायतने मागील चार-पाच वर्षापासून ही जागा नावे करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते़ मात्र सहकार आयुक्तांच्या परवानगीचे पत्र लेआऊट नसल्याचे सांगून हा प्रकार आतापर्यंत थांबला होता़ मात्र ग्रामसेवकांना हाताशी धरून एका बड्या नेत्याने प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतला़ त्यानंतर उर्वरितांनी बॉण्ड पेपरच्या आधारे प्लॉट नावे करून घेण्याची स्पर्धाच सुरू केली़
मागील गुरुवारी रात्रीपासून उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यासाठी लोकांची जणू स्पर्धाच लागली़ परिणामी प्रचंड गर्दी होत आहे़ जागा मिळविण्याच्या चढाओढीत वाद निर्माण होत असून शुक्रवारी सकाळी काही लोकांमध्ये हाणामारीही झाली.