दिवाळीसाठी पुण्याहून दुचाकीवर नांदेडला निघालेल्या भावंडांचा अपघात; एका भावाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 12:03 PM2024-11-04T12:03:16+5:302024-11-04T12:03:41+5:30
पुण्यात सोबत राहायचे दोघे भाऊ, एक कंपनीत काम करत असे तर दूसरा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे
मारतळा : दिवाळी सणासाठी पुण्याहून दुचाकीने नांदेडला येत असलेल्या दोन भावंडांच्या दुचाकीला भरधाव मालवाहू टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला, तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान पूर्णा तालुक्यातील दस्तापूर शिवारात घडली. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव बालाजी कोंडीबा मोरे (वय २४) असे आहे. तर त्याचा छोटा भाऊ पंढरीनाथ कोंडीबा मोरे (वय २२) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नायगाव तालुक्यातील टाकळी येथील दोन्ही सख्खे भाऊ पुणे येथे राहत होते. एक पॉलिटेक्निक पूर्ण करून ‘यूपीएससी’ची तयारी करीत आहे, तर दुसरा ‘आयटीआय’चा कोर्स करून पुणे येथील एका कंपनीत जॉब करतो. दरम्यान, दोघेही भाऊ गुरुवारी दिवाळी सणासाठी गावाकडे येण्यासाठी सकाळीच दुचाकीने निघाले. ही दुचाकी परभणी जिल्ह्यातील दस्तापूर शिवारात येताच अपघात घडला.
अपघातस्थळ हे ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. त्यानंतर अंत्यविधीसाठी नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. १ नोव्हेंबरला मृत बालाजी मोरे या युवकावर टाकळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. प्रतिकूल परिस्थितीतून ‘कमवा आणि शिका’ या संघर्षातून ‘यूपीएससी’ची तयारी पुणे येथे करत होता. मात्र, उच्चशिक्षित व उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बालाजी मोरे या युवकावर काळाने घाला घातला. त्याच्या मृत्युमुळे आई-वडील व नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.