रुग्ण वाहनात, डॉक्टर ढाब्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:20 AM2018-10-28T01:20:18+5:302018-10-28T01:22:23+5:30

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना त्वरित आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी १०८ ही आपात्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे़

In the sick vehicle, doctor is on the dhaba! | रुग्ण वाहनात, डॉक्टर ढाब्यावर !

रुग्ण वाहनात, डॉक्टर ढाब्यावर !

Next
ठळक मुद्देआपातकालीन सेवा १०८ रुग्णवाहिकेत तासभर वेदनेने विव्हळली महिला

शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना त्वरित आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी १०८ ही आपात्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे़ या सेवेमध्ये एका तासाच्या आत संबंधित रुग्णाला घेवून निश्चित केलेल्या शासकीय रुग्णालयात दाखल करणे बंधनकारक आहे़ असे असताना तामसा येथील एका महिला रुग्णाला रुग्णवाहिकेतच ठेवून यातील डॉक्टर आणि चालकाने पाऊणतास एका ढाब्यावर ‘रश्श्यावर’ यथेच्छ ताव मारला़ यामुळे रुग्णाला अंधाऱ्या रात्री रुग्णवाहिकेतच वेदना सहन करीत ताटकळावे लागले़
नांदेड जिल्ह्यात १०८ या आपात्कालीन सेवेच्या १६ रुग्णवाहिका धावतात़ आजपर्यंत या रुग्णवाहिकेतून हजारो रुग्णांना आरोग्यसेवा मिळाली आहे़ त्यातून अनेकांचे प्राणही वाचले आहेत़ परंतु काहीवेळा या रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि चालकांच्या भूमिकेमुळे ही चांगली सेवा बदनाम होत आहे़ असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला़
तामसा येथील एका महिलेला उपचारासाठी हदगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ यावेळी हदगाव येथील डॉक्टरांनी महिलेला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला़ त्यानंतर १०८ या रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला़
थोड्याच वेळात (एम़एच़१४, सीएल १२५२) या क्रमांकाची रुग्णवाहिका तेथे आली़ या रुग्णवाहिकेतून महिलेला नांदेडकडे आणत असताना अंधार पडला होता़ यावेळी चालकाने रस्त्याच्या कडेला ही रुग्णवाहिका उभी करुन डॉक्टरसोबत एका ढाब्यावरील जेवणावर ताव मारत तृप्तीचा ढेकर दिला़ दरम्यान, तब्बल पाऊणतास मात्र महिला वेदनेने विव्हळत रुग्णवाहिकेतच होती़
यावेळी महिलेसोबत त्यांचे पतीही होते़ एका तासाच्या आत रुग्णापर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करेपर्यंत ही रुग्णवाहिका कुठेच थांबवू नये असा नियम आहे़ असे असताना तब्बल पाऊणतास ही रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेलाच थांबविण्यात आली़
रुग्णाची घेतली होती परवानगी
याबाबत १०८ या आपातकालीन रुग्णसेवेचे जिल्हा समन्वयक डॉ़सुनिल कुलकर्णी म्हणाले, रुग्णासोबत कुणीही नव्हते़ जवळ पैसे नसल्यामुळे त्यांनी गावाकडून कुणी व्यक्ती पैसे घेवून येईपर्यंत रुग्णवाहिका थांबविण्याची विनंती केली होती़ विनाकारण अशाप्रकारे आम्ही रुग्णवाहिका थांबवत नाही़ त्यात डॉक्टर आणि चालक सकाळपासून उपाशीच होते़ त्यामुळे रुग्णाची परवानगी घेवून ते जेवणासाठी गेले होते़
डॉक्टर फ्रंट सिटवरच !
१०८ या रुग्णवाहिकेत एकदा रुग्णाला घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यावर प्रथमोपचार करणे आवश्यक असते़ त्यानंतर रुग्णवाहिकेचा प्रवास सुरु असताना डॉक्टर हे रुग्णाजवळ मागील सिटवरच असणे आवश्यक आहे़परंतु, अनेक रुग्णवाहिकांमध्ये रुग्णाला मागील सिटवर सोडून डॉक्टर चालकासोबत फ्रंट सिटवर बसत आहेत़ त्यामुळे रुग्णाची प्रकृती कशी आहे ? याबाबत डॉक्टर मंडळीकडून बेफिकरपणा करण्यात येत असल्याचे दिसून येते़

Web Title: In the sick vehicle, doctor is on the dhaba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.