सिद्धेश्वरचे पाणी विष्णूपुरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:28 AM2018-04-21T00:28:02+5:302018-04-21T00:28:02+5:30
शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेतलेले १० दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात येण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांत जवळपास १ दलघमी पाणी पोहोचले असून कॅनॉलद्वारे पाणी घेण्यात येत असल्याने संथगतीने पोहोचत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेतलेले १० दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात येण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांत जवळपास १ दलघमी पाणी पोहोचले असून कॅनॉलद्वारे पाणी घेण्यात येत असल्याने संथगतीने पोहोचत आहे.
नांदेड शहरासाठी पूर्णा पाटबंधारे विभागाच्या सिद्धेश्वर प्रकल्पात १० दलघमी पाणी राखीव ठेवण्यात आले होते. नांदेड शहरासाठीच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता १५ एप्रिलपासून सिद्धेश्वर प्रकल्पातून १० दलघमी पाणी घेण्यास प्रारंभ झाला आहे. हे पाणी १८ एप्रिल रोजी विष्णूपुरी प्रकल्पात दाखल झाले आहे. सिद्धेश्वर, पूर्णा, वसमत, तळणी, नाळेश्वरपर्यंत जवळपास ६० किलोमीटर अंतराहून पाणी कॅनॉलद्वारे आणले जात आहे. नाळेश्वरहून नाल्यामार्गे गोदावरी नदीत पाणी घेतले जात आहे. हे पाणी १५ एप्रिलपासून सोडण्यात आले आहे.
या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पाटबंधारे विभाग तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्याचवेळी विद्युत पुरवठाही खंडित केला जात आहे. कार्यकारी अभियंता आर.एन. देशमुख, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता निळकंठ गव्हाणे, उप अभियंता बोधनकर आदी अधिकारी, कर्मचारी या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत.
नांदेड शहरासाठी असलेली पर्यायी पाणीपुरवठा योजनाही सध्या सुरु आहे. इसापूरचे दोन दलघमी पाणी ८ एप्रिल रोजी पोहोचले होते. या पाण्यातून २५ दिवसांची तहान भागणार आहे.
इसापूरमधून आणखी अडीच दलघमी पाणी मे महिन्यामध्ये घेतले जाणार आहे. विष्णूपुरी आणि आसनेत उपलब्ध होणाºया पाण्यातून नांदेडकरांना उन्हाळ्यात पाणी देण्याची व्यवस्था महापालिका करीत आहे. यापूर्वीच नियोजन केल्यामुळे सध्यातरी पाण्याचा प्रश्न उद्भवला नसल्याचे दिसत आहे.
मात्र पावसाळा लांबल्यास जूनमध्ये पाण्याची अडचण उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात आजघडीला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या वेळापत्रकात सध्यातरी कोणताही बदल अपेक्षित नसल्याचेही मनपा पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शहरातील काही भागांत अद्यापही पाण्यासाठी ओरड सुरु आहे. वेळीअवेळी पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जलवाहिनीतील गळती, कर्मचाºयांची कमतरता आदी बाबींमुळे पाणीपुरवठा वेळापत्रक विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, यापूर्वी १२ मार्च रोजी दिग्रस बंधाºयातून २५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात घेण्यात आले होते. त्यावेळी सिंचनाच्या नियोजित पाणी पाळ्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्याने तळ गाठला होता.
त्या पार्श्वभूमीवर इसापूर प्रकल्पातून महापालिकेने २ दलघमी पाणी आसना नदीत घेऊन पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराची तहान भागविली होती.
१० दलघमी पाण्याची मागणी
विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ८ दलघमी पाणी उपलब्ध आहे. सिद्धेश्वरमधून घेण्यात येणाºया १० दलघमीपैकी ५ दलघमी पाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे. पाणी येतानाचे लॉसेस मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याचवेळी महापालिकेने लॉसेस वगळता विष्णूपुरी प्रकल्पात १० दलघमी पाणी पोहोचेल इतके पाणी सोडावे, अशी मागणी केल्याचे कार्यकारी अभियंता अंधारे यांनी सांगितले.