सुटकेचा नि:श्वास! मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 07:28 PM2022-11-21T19:28:25+5:302022-11-21T19:33:28+5:30

२००८ मध्ये एका वादातून तो तुरुंगात गेला अन् कुख्यात आरोपींच्या संपर्कात येऊन त्याचे आयुष्यच बदलून गेले.

Sigh of relief! Most wanted Khalistani terrorist Harvinder Singh Rinda died in Pakistan | सुटकेचा नि:श्वास! मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू

सुटकेचा नि:श्वास! मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू

googlenewsNext

नांदेड: खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाच्या साथीदारांनी येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला नोव्हेंबरमध्ये सात महिने होतात. शनिवारी बियाणी यांचा जन्मदिवस होता. त्यानिमित्त शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. योगायोग म्हणजे शनिवारीच रिंदा याचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नांदेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला.

हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा हा पंजाबमधील तरणतारण येथील रहिवासी होता. २००८ मध्ये एका वादातून तो तुरुंगात गेला अन् कुख्यात आरोपींच्या संपर्कात येऊन त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्यापूर्वी तो सामान्य जीवन जगत होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो नांदेडात आला. त्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात एक-एक पाऊल टाकण्यास त्याने सुरुवात केली. खलिस्तानीच्या नावावर त्याने येथील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माळी कुटुंबीयासोबतच्या पूर्ववैमनस्यातून त्याने बच्चितरसिंघ माळी यांचा खून केला. तसेच माळी कुटुंबीयांशी घनिष्ट संबंध असलेल्या अनेकांना धमकाविणे, गोळीबार केला. मात्र, पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्याची हिमंत वाढतच गेली. त्यानंतर त्याने खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्याचा सपाटा लावला. त्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार केला होता. आजही कोकुलवार हे अंथरुणाला खिळून आहेत. त्याचबरोबर शहरातील इतरही व्यापाऱ्यांवर गोळीबाराच्या घटना घडल्या. 

रिंदाच्या दहशतीने अनेकांनी त्याला कोट्यवधींची खंडणी दिली. तर काहीजण पोलिसांकडे गेले. पोलिसांकडून अशा व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात आली; परंतु सर्वाधिक खळबळ उडाली ती ५ एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येने. बियाणी यांना रिंदाने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती; परंतु खंडणी मिळत नसल्याने अद्दल घडविणे आणि दहशत कायम ठेवणे, या उद्देशाने त्याच्या साथीदारांनी घरासमोरच बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या. बियाणी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या प्रकरणात पोलिसांवरही प्रचंड दबाव होता. एसआयटीने या प्रकरणात एक-एक कडी जोडत आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली. तर दिल्ली पोलिसांनी एका शार्प शूटरला पकडले. तर रिंदा यांचा पाकीस्तानात मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे गेली काही वर्षे दहशतीत असलेल्या नांदेडकरांनीही सुटकेचा श्वास सोडला.

२०२० मध्ये पाकीस्तानात
रिंदा हा २०२० मध्ये पाकिस्तानात पळून गेल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी आयएसआयच्या इशाऱ्यावरून तो भारतात देशविघातक कारवाया करीत होता. 

पंजाबला २३ गुन्ह्यांत हवा होता रिंदा
पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी करणाऱ्या रिंदावर पंजाबमध्ये खून, खंडणी, लूटमार असे जवळपास २३ गुन्हे दाखल आहेत. पंजाबमध्ये रुपनगर, पटीयाला, लुधियाना आणि जालंधर या परिसरात त्याची दशहत होती. लुधियाना न्यायालय, मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातही रिंदाचा सहभाग होता. नांदेडमध्येही रिंदावर खून, खंडणी यासह अनेक गुन्हे आहेत.

शार्प शुटरचा शोध सुरु
अन्य एक शार्प शूटर आणि मुख्य आरोपी रिंदा हा फरार होता. त्यातच शनिवारी संजय बियाणी यांच्या जन्मदिवशीच रिंदाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकले.

Web Title: Sigh of relief! Most wanted Khalistani terrorist Harvinder Singh Rinda died in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.