अतिक्रमणाच्या मुद्द्यावर बांधकाम सभापतींची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:21+5:302021-03-05T04:18:21+5:30

नांदेड : आमदार बालाजी कल्याणकर यांनी तरोडा येथील जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मांडला ...

Silence of construction chairpersons on the issue of encroachment | अतिक्रमणाच्या मुद्द्यावर बांधकाम सभापतींची चुप्पी

अतिक्रमणाच्या मुद्द्यावर बांधकाम सभापतींची चुप्पी

Next

नांदेड : आमदार बालाजी कल्याणकर यांनी तरोडा येथील जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मांडला असून, याप्रकरणी ग्रामविकास मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याच अतिक्रमणाचा मुद्दा गुरुवारी जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत उपस्थित झाला असता, बांधकाम सभापती संजय बेळगे यांना कुठलेही उत्तर देता आले नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कार्यवाहीबाबत चर्चा करु, असे नेहमीचे उत्तर देऊन त्यांनी हा प्रश्न टाळला. गुरुवारी सभापती बेळगे यांच्या दालनात बांधकाम समितीची बैठक झाली. या बैठकीला व्यंकटराव पाटील गोजेगावकर, साहेबराव धनगे, मोनाली पाटील, मनोहर शिंदे, मधू राठोड आदी उपस्थित होते. या बैठकीत धनगे यांनी तरोडा नाका येथील जिल्हा परिषद जागेवरील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. मागील काही वर्षांपासून या विषयावर बांधकाम समितीच्या बैठकीत चर्चा झडत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, बैठकीत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चौधरी आणि निविदा विभागाचे क्षीरसागर यांना समिती सदस्यांच्यावतीने निरोप देण्यात आला. या बैठकीनंतर शिक्षण समितीची बैठकही झाली. या बैठकीला व्यंकटराव पाटील, अनुराधा पाटील, बबनराव बारसे, संध्याताई धोंडगे, लक्ष्मणराव ठक्करवाड, साहेबराव धनगे आदी उपस्थित होते.

प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी १,२५० लाख रुपये तसेच माध्यमिक शाळा दुरुस्तीसाठी १४९ लाख आणि नव्या खोल्यांच्या बांधकामासाठी १,५५० लाख रुपयांच्या कामांना या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामांसाठीचा ठराव डी.पी.डी.सी.ला पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

चौकट------------

दहावी, बारावी परीक्षांची शिक्षण विभागाकडून तयारी

२३ एप्रिल रोजी बारावीची तर २९ एप्रिल रोजी दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी बेंच उपलब्ध नाहीत, अशा परीक्षा केंद्रांवर इतर शाळातील बेंच उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विस्तार अधिकाऱ्यांना दिल्या असून, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा देण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा सूचना दिल्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले. परीक्षेसाठी ठेवलेला ३ लाखांचा निधी गतवर्षी खर्च झाला नव्हता. यावर्षी तो पथकासाठी लागणाऱ्या वाहनांसाठी खर्च करावा, अशी सूचना यावेळी सदस्यांनी केली.

Web Title: Silence of construction chairpersons on the issue of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.