सिंदखेड पोलीस ठाणे स्थलांतराचे कोडे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:32 AM2018-11-16T00:32:35+5:302018-11-16T00:32:53+5:30
काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.
श्रीक्षेत्र माहूर / वाई बाजार : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले निजामकालीन सिंदखेड पोलीस ठाण्याची जीर्ण इमारत, त्यातच कोणत्याही भौतिक सुविधेविना पोलीस कर्मचाऱ्यांंना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत पाहता मागील काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.
एकेकाळी विजयकुमार नामक नक्षलवाद्याच्या नक्षली कारवायामुळे चर्चेत आलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या या इमारतीचे बांधकाम निजामकालीन आहे. वाई बाजार, सारखणी या मुख्य रहदारीच्या बाजार पेठेसह एकूण ५२ गावच्या सुरक्षेची जबाबदारी याच सिंदखेड पोलिस ठाण्याकडे आहे. माहूर-किनवट राज्य मार्गापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या या जीर्ण ठाणे इमारतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधेशिवाय कर्मचाºयांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. दरम्यान, एका सहायक पोलिस निरिक्षकासह एकूण ३२ कर्मचाºयांची नियुक्ती आहे. त्यापैकी ३ पोलीस कर्मचारी न्यायालयीन कामकाज, ३ कर्मचारी समंस व वारंट तामील करण्यासाठी, १ आमदारांचे अंगरक्षक, तर कर्मचारी ३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. परिणामी उर्वरीत २२ कर्मचारी हे ५२ गावात वसलेल्या २६ हजार लोकसंख्येच्या सुरक्षेची खबरदारी घेत आहेत. कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतांना देखील पुरक सोयी सुविधांअभावी कर्तव्य पार पाडतांना कर्मचारी वर्गाचे मानसिक संतुलन बिघडणे स्वाभाविकच आहे.
याबाबत अनेकवेळा निवेदने व पाठपुरावा करून भौतिक सुविधेसाठी ठाणे इतरत्र हलवण्याची मागणी झाली. परंतु आदिवासी व दुर्गम भागातील सिंदखेड पोलिस ठाणे इतरत्र हलवण्याची प्रक्रिया अद्यापही दुर्लक्षितच आहे.
भौतिक सुविधेअभावी दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या सिंदखेड पोलिस ठाण्यास गृह विभागामार्फत सोईच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी मागील काळात हालचाली झाल्या़ परंतु अद्याप स्थलातराची कार्यवाही शुन्यच आहे. त्यातच अपुºया संख्याबळावर दुर्गम भागातून कायदा व सुव्यवस्थेची अत्यावश्यक सेवा देणे सिंदखेड पोलिसांना अवघड बनले असून प्रसंगी तारेवरची कसरत ठरते.
जनतेच्या सेवातत्परतेसाठी पोलीस ठाणे मोक्याच्या ठिकाणी असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. पोलिस ठाणे वाईबाजार सारख्या मोक्याच्या ठिकाणी असल्यास नागरीकांना तत्पर सेवा देणे शक्य होईल़ तसेच पोलीस कर्मचाºयांचीही हेळसांड होणार नाही. त्यामुळे ठाणे स्थलांतर करावे, अशी मागणी आहे़
वाई बाजार येथे पोलीस ठाणे स्थलांतरीत केल्यास वाई बाजारसह परिसरातील छुप्या पध्दतीने सुरू असलेले अवैध व्यवसायावर अंकुश लागेल. सोबतच अतिसंवेदनशील म्हणून गणल्या जाणा-या वाईबाजार मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पोलीस कर्मचा-यांना कर्तव्यात भौतिक अडचणी येणार नाहीत. यासाठी वाईबाजार हेच योग्य ठिकाण आहे - बाबाराव कंधारे, सामाजिक कार्यकर्ता, वाई बाजार