साहेब, कोरोनाने नाही तर पीपीई कीटने मरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:26+5:302021-04-04T04:18:26+5:30
नांदेड : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या तसेच मृत्यूंचे प्रमाणही वाढत असताना आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. त्यात नांदेडचा पारा ...
नांदेड : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या तसेच मृत्यूंचे प्रमाणही वाढत असताना आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. त्यात नांदेडचा पारा ४२ अंशाच्या घरात पोहोचला आहे. या उकाड्याच्या परिस्थितीत कोरोना होऊन नाही तर पीपीई कीटमुळे होणाऱ्या त्रासाने मरू, अशी भीती परिचारिका, ब्रदर्स, टेक्निशियन आणि कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्ष सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना वाटत आहे. नांदेड जिल्हा काेरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाला चांगले यश आले होते. परंतु, मार्चच्या पहिल्या आठवड्यातून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांचा आकडा कमी करण्यात प्रशासन हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत वाढणारी कोरोना रूग्णसंख्या आणि मृत्यूंचे प्रमाण आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढविणारे आहे. कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्यक्षात काम करणारे कोरोना योद्धे खरंच स्वत:च्या जीवाची बाजी लावून कोरोना रूग्णांना सेवा देत आहेत. आजच्या उष्णतेच्या वातावरणात सहा ते आठ तास पीपीई कीट घालून सेवा बजावणे हे मोठ्या जिकरीचे काम ठरत आहे. बहुतांश डॉक्टरांनी तर कोविड केअर सेंटरमध्ये जाणे बंद करून पीपीई कीट घालणेही बंद केले आहे. परंतु, शासकीय रूग्णालयातील परिचारिका, ब्रदर्स देत असलेल्या सेवेला रूग्णांकडून सलाम ठोकला जात आहे. त्यात काही डॉक्टरही आजघडीला जीव लावून सेवा देत आहेत तर काहीजण केवळ कोरोना योद्धे असल्याचा दिखावा करत आहेत.
पीपीई कीट म्हणजे एकप्रकारचे प्लास्टिकच असून, ते घालून चेहरा पूर्ण पॅक करणे, चेहऱ्यासह शरिराला कुठेही साधी हवा स्पर्श करू शकत नाही, अशाप्रकारच्या कपड्यात दिवस काढून हे कोरोना योद्धे सेवा बजावत आहेत.
पीपीई कीट घातल्यानंतर जवळपास तासाभरातच संपूर्ण शरीर घामाने ओलेचिंब होते. त्याचबरोबर शरिरातील शुगर कमी होऊन चक्कर आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सहा ते सात तास कधी संपतात असे होते. अक्षरश जीव गुदमरतो.
- सुषमा भोसले, परिचारिका.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, अशा परिस्थितीत प्लास्टिकचे पीपीई कीट घालून काम करणे म्हणजे जीव धोक्यात घातल्यासारखे होते. सलग आठ तासांऐवजी चार तास पीपीई कीट घालून काम करण्यासाठी मुभा द्यायला हवी.
- परिचारिका, शासकीय रूग्णालय.
सध्या येत असलेल्या पीपीई कीटचा दर्जा सुधारला असून, जाड प्लास्टिकच्या येत आहेत. त्यामुळे सुरक्षा वाढली, परंतु श्वास गुदमरण्याचे प्रमाण वाढले. पेटीत बंदिस्त राहून काम केल्यासारखे वाटते. यावर काहीतरी उपाय शोधणे गरजेचे आहे.
- डॉक्टर, शासकीय रूग्णालय, नांदेड.