बहिणीचे भावाला तर पुतण्यांचे काकांना आव्हान; कुटुंबातील उमेदवारांमुळे 'सगे सोयरे' गोंधळात
By श्रीनिवास भोसले | Published: November 9, 2024 01:42 PM2024-11-09T13:42:34+5:302024-11-09T13:42:55+5:30
कुटुंबातील दोन इच्छुकांचा शाब्दिक चकमकीपासून ते कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंतचा वाद आता थेट निवडणूक आखाड्यात उतरला आहे.
- श्रीनिवास भोसले
नांदेड : भावाच्या विरोधात बहीण तर काकांच्या विरोधात पुतण्यांनी विधानसभेत दंड थोपटले आहेत. दुसरीकडे एक भाऊ काँग्रेसकडून विधानसभा तर दुसरा भाऊ भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात आहे, अशा या एकाच कुटुंबातील उमेदवारांमुळे भावकी अन् सगे सोयरेदेखील मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड, किनवट आणि नांदेड दक्षिणमधील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात नेहमी काका-पुतण्याच्या राजकारणाची चर्चा होते. परंतु, नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात भास्करराव खतगावकर आणि अशोकराव चव्हाण या दाजी-मेहुण्याच्या राजकारणाची चर्चा असते. त्यात मागील पाच वर्षात आमदार शामसुंदर शिंदे आणि त्यांचे मेहुणे प्रतापराव चिखलीकर यांच्यादेखील राजकीय कुरघोड्या सुरूच राहिल्या. या दाजी-मेहुण्याच्या राजकीय वादात प्रतापराव यांची बहीण आशा शिंदे यांनी अनेक वेळा उडी घेतली. शाब्दिक चकमकीपासून ते कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंतचा वाद आता थेट निवडणूक आखाड्यात उतरला आहे. माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्याविरोधात त्यांची बहीण आशाताई शिंदे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे चिखलीकर आणि शिंदे यांच्या सगेसोयऱ्यांपुढे कुणाचा प्रचार करायचा, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पाहुण्यांनी बघ्याची भूूमिका घेत ऐनवेळी निर्णय घेऊ अन् गुप्त मतदान करू, असाच काहीसा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आजी-माजी आमदारांना त्यांच्याच पुतण्यांनी आव्हान दिले आहे.
मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांना त्यांचाच पुतण्या संतोष राठोड यांनी आव्हान दिले आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करत 'ऑटोरिक्षा'च्या गतीने ते प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बंजारा समाजाच्या मतांचे विभाजन होईल. तसेच काका-पुतण्याच्या राजकीय लढाईत कुणाचा प्रचार करावा आणि कुणासोबत फिरावे यामध्ये भावकी बुचकळ्यात पडली आहे. तसेच किनवटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हाती तुतारी दिली आहे. पण, या 'तुतारी'चा आवाज दाबण्यासाठी त्यांचाच पुतण्या सचिन नाईक यांनी 'शिटी' वाजवत प्रदीप नाईक यांच्या विरोधात अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यामुळे माजी आमदार नाईक यांच्यासह नाईक परिवारातील सदस्यदेखील अडचणीत सापडले आहेत. भोकरमध्ये अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया भाजपकडून तर त्यांची भाचेसून डॉ. मीनल खतगावकर नायगावमध्ये काँग्रेसकडून विधानसभेच्या रिंगणात आहे.
हंबर्डे बंधू वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवार
नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांचे सख्खे बंधू डाॅ. संतुकराव हंबर्डे भाजपचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना भाजपने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होत असल्याने आता हंबर्डे परिवारातील मतदारांना क्रॉस व्होटिंगशिवाय पर्याय उरला नाही. दोघा भावांच्या राजकारणासाठी भावबंदकी नाराज नको म्हणत हंबर्डे परिवारासह त्यांच्या नातेवाईकांनीदेखील दोघांनाही साथ देण्याचा सामूहिक निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पण, प्रत्यक्ष प्रचार करताना कोणासोबत फिरायचे, असा गोंधळ भावकी आणि सगेसोयऱ्यांत आहे.