सहा वर्षांत एकाही बालमजुराचा शोध लागला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:04 IST2019-06-30T01:02:38+5:302019-06-30T01:04:01+5:30
पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़

सहा वर्षांत एकाही बालमजुराचा शोध लागला नाही
भारत दाढेल ।
नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़
बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील काही वर्षांत बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले होते़ परंतु जिल्ह्यात हजारो बालमजूर आहेत़ कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत़ आई, वडिलांच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित, वंचित जाती-जमातीची मुले बालमजुरीकडे वळतात़
या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न झाले नाहीत. शासनाने सन २०१६ ला बाल व किशोरवयीन प्रतिबंधक नियमन अधिनियम अंमलात आणला़ त्यानुसार १४ वर्षांखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे़
१४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसाय करण्यास लावणे आणि प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असला तरी जिल्ह्यात हजारो बालके धोक्याच्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत़ आता १८ वर्षांखालील बालक बालमजूर म्हणून गणल्या जात आहे़
४०० रूपये शिष्यवृत्ती
बालमजूर दररोज १५० ते २०० रूपये कमावतात़ सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला ४०० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते़ त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे़ बालमजुरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत़ काही वडिलांच्या व्यसनामुळे बालमजुरी फोफावत आहे़ कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बालमजुरांची पाहणी केली जाते़ त्यानुसार २०१२ ते २०१७ या वर्षात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ बालमजुरांच्या संदर्भात तक्रार आल्याशिवाय हे कार्यालय कामच करीत नाही़ मागील वर्षी एका बालमजुराला पकडण्यात आले होते़
काय सांगतो कायदा...?
१४ वर्षांखालील बालकास व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असून फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार व कमाल ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होवू शकते़ गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ३ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा़ किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा़