विद्यापीठ परीक्षेचे ढिसाळ नियोजन; तब्बल साडेचार तासांनी ओपन झाली ऑनलाईन लिंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 02:35 PM2020-10-17T14:35:08+5:302020-10-17T14:42:32+5:30
साडेअकरा वाजताची परीक्षा चार वाजेपर्यंत सुरूच नाही
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षांना १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी साडेआकरा वाजता सुरु होणारी परीक्षा दुपारी ४ वाजेपर्यंत आॅनलाईन लिंक ओपन न झाल्यामुळे सुरूच झाली नाही.
स्वारातीम विद्यापीठांतर्गत साधारणपणे दीडशे केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत़ २०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील बीए, बीएस्सी, बीकॉम या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राचे १५ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत़ याशिवाय इतर विविध अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राचे जवळपास ३० हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
१५ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणारी परीक्षा आॅनलाईन प्रश्नपत्रिका प्राप्त न झाल्यामुळे वेळेवर सुरू करता आली नाही़ त्यामुळे परीक्षार्थींना दोन, तीन तास ताटकळत बसावे लागले़ अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रश्नपत्रिका उपलब्ध न झाल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले़ परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सकाळी साडेअकरापासून दुपारी २ वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका मिळाली नाही. शेवटी दुपारी चार वाजता लिंक ओपन झाल्याचा संदेश मिळाला.
आजची परीक्षा पुढे ढकलली
विद्यापीठाच्या आॅनलाईन व आॅफलाईन परीक्षेत तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना पेपर देता आला नाही. या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी सकाळी साडेआकरा वाजता संबंधित परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे १७ आॅक्टोबर रोजीचे नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हा पेपर २८ आॅक्टोबर रोजी होणार आहे.
नेटकॅफेवर थकलो
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पेपर होता़ मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत प्रश्नपत्रिकाच उपलब्ध झाली नाही. नेटकॅफेवर जाऊन चेक केले. मात्र, उपयोग झाला नाही़ गुरुवारीही असेच झाले़, असे धर्माबाद तालुक्यातील बीजेचा विद्यार्थी अवंदास वाघमारे याने सांगितले.