सॉफ्ट स्किल्स यशस्वी जीवनाचे सूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:48 AM2018-04-20T00:48:44+5:302018-04-20T00:48:44+5:30
मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मानवाला आपल्या जीवनात अनेक संकटांवर मात करून उभे राहावयाचे असेल तर माणूस म्हणून उभे राहण्याचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. माणसाच्या यशामागे ८५ टक्के वाटा हा सॉफ्ट स्किल्सचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने हे सॉफ्ट स्किल्स आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी व लेखिका अंजली धानोरकर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाची मशागत केली पाहिजे. माणूस घडण्याची प्रकिया समजून घेतली पाहिजे. सध्याच्या काळात ग्लोबल निकष महत्त्वाचे आहे.
त्यामुळे हे निकष नीटपणे समजून घेऊन पुढे जायला हवे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, हे आपणास धानोरकरांच्या व्याख्यानातून लक्षात आले आहे. हे स्किल्स आपण आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे सदस्य स्वामी सुरेंद्र यांनी केले. तर आभार गंगाप्रसाद इंगोले यांनी मानले. यावेळी दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राम जाधव, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल, सहायक कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागातील कर्मचारी संभा कांबळे, सुनील कांबळे, बालाजी शिंदे, दत्ता येवले, प्रवीण राठोड या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.