हिरानगरचे भूमिपुत्र जवान सुधाकर राठोड लेह येथे शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:32 IST2024-11-26T15:29:25+5:302024-11-26T15:32:12+5:30
सियाचीन भागात ग्लेशियर कोसळून कर्तव्यावर असलेले जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले

हिरानगरचे भूमिपुत्र जवान सुधाकर राठोड लेह येथे शहीद
नांदेड : मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील भूमिपुत्र सैनिक सुधाकर शंकर राठोड हे केंद्रशासित प्रदेश लेह येथे कर्तव्य बजावत असताना २५ नोव्हेंबर रोजी बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकून त्यांना वीरमरण आल्याची दुःखद घटना घडली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील रहिवासी सुधाकर शंकर राठोड (३९) १२ नोव्हेंबर रोजी लेह येथे कर्तव्यावर असताना त्यांच्या अंगावर बर्फाचा ढिगारा कोसळला. या घटनेत ते बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तिसऱ्या दिवशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवानाचा शोध लागला. यावेळी त्यांना जम्मू येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील रुग्णालयात प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना १६ नोव्हेंबर रोजी चंदिगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार घेत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, ८ वर्षांचा मुलगा व ६ वर्षांची मुलगी आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जवानाचे पार्थिव मंगळवारी पहाटे चंदीगड येथून हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी हिरानगर येथे त्यांच्यावर सकाळी १० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला जाईल.