सालगड्याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:47 AM2019-03-15T00:47:08+5:302019-03-15T00:48:03+5:30
सालगड्याचे काम करुन परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील शकुंतलाने विवाहानंतरही जिद्दीने पोलिस उप निरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून दोन परीवारांचे नांव उज्वल केले आहे.
राजेश वाघमारे।
भोकर : सालगड्याचे काम करुन परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील शकुंतलाने विवाहानंतरही जिद्दीने पोलिस उप निरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून दोन परीवारांचे नांव उज्वल केले आहे.
हदगाव तालुक्यातील वानवाडी येथील रहिवासी असलेले गोबाडे कुटुंबात पांडुजी व जनाबाई दांपत्य सालगडी म्हणून जीवन बसर करीत आहे. मुळचे पोटा ता. हिमायतनगर येथील परंतू पोटाची खळगी भरण्यासाठी काम मिळेल तेथे जात होते. काहीकाळ आंबेगाव ता. अधार्पूर येथे वास्तव्य करुन वानवाडी येथे स्थाईक झाले.
कुटुंबात दोन मुलीनंतर तिसरी मुलगीच जन्माला आली़ तिचे नाव शकुंतला. परिवारात मुलगा नसला तरी मुलींनाच मुलगा समजून गोबाडे दांपत्याने सांभाळ केला. शकुंतलाने आदिवासी आश्रमशाळा चेनापूर ता.अर्धापूर येथून प्राथमिक शिक्षणाला सुरुवात करीत सन २००७ मध्ये दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर बारावीचे शिक्षण श्री दत्त महाविद्यालयात २००९ मध्ये घेतले. तर माहूर अद्यापक विद्यालयात २०१२ मध्ये डीएडचे शिक्षण घेतले. एवढ्यावरच न थांबता मुक्त विद्यापिठातून २०१४ मध्ये बी.ए. ची पदवी मिळवली.
शकुंतलाची गुणवत्ता पाहून नात्यातील प्रा. एस.पी. ढोले यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने भविष्यात काहीतरी वेगळे करावे, आपणही अधिकारी व्हावे, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी अशी महत्वाकांक्षा जागृत झाली. त्यामुळे पदवीचे शिक्षण संपल्यानंतर नांदेडला राहून सतत ३ वर्षे मुलांचे शिकवणीवर्ग घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. सन २०१४ पासून विविध पदाच्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. २०१६ मध्ये एका मार्काने चांगली संधी हुकली तरीही खचून न जाता पुन्हा जिद्दीने राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी केली. २०१७ मध्ये औरंगाबाद येथे क्लासेस लावले.
याच दरम्यान भोकर तालुक्यातील साळवाडी डोरली येथील चांदु भिमराव देवतूळे यांच्याशी फेब्रुवारी २०१८ मध्ये शकुंतलाचा सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह झाला. पती, सासु, दिर व जावू, विवाहित ननंद असा नवा परीवार मिळाला. फक्त २ एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंबाची भिस्त.
नवेघर नवा परीवार सारे काही नवीन असले तरी मनातील महत्वाकांक्षा सासरी बोलून दाखवली. यास पतीसह सासरच्यांनी संमती देत शकुंतलाला हवे ते सहकार्य केले.
पती पदव्युत्तर असल्याने त्यांनाही औरंगाबाद मध्येच काम मिळाले. दरम्यान पोलीस उप निरिक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु झाल्याने अर्ज केला. अनुसूचित जमाती प्रवगार्तील १४ जागांसाठीच्या परीक्षेत ७ वा रेंक मिळाला. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशीच परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजले.
आई - वडीलांची व पतीच्या इच्छेला मुर्तरुप मिळाले. दोन्ही कुटुंबात आजवर कोणीही सरकारी नौकरीत नव्हते. तेथे एका महत्वाकांक्षी उमेदीला फळ मिळाले. आदिवासी वस्ती असलेल्या साळवाडी डोरलीत आनंद मावेनासा झाला होता. पोलीस विभागात गावची सून फौजदार झाल्याने सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव देवतूळे तसेच गावकऱ्यांनी शंकुतलाचे भरभरून कौतुक केले.
युपीएससीची तयारी करणार
वडील सालगडी असल्याने बेताचे जगने नसीबी आले. त्यात आम्ही तीघी बहिणी सर्व भार वडीलांवरच होता. माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यानंतर मी एकटी लग्नाची उरली. नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे एक अनपेक्षित घटना जीवनात घडली. त्यातून सावरण्यासाठी मेहनती शिवाय पर्याय नाही असा निश्चय करुन स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरवात केली. यात योग्य यश मिळाले. पोलीस उप निरिक्षक झाले तरी आणखी युपीएससी ची तयारी करण्याची इच्छा आहे. आता वडील थकले आहेत त्यांनी माझा मुला प्रमाणे सांभाळ केला. मी अधिकारी व्हावे त्यांची इच्छा पूर्ण करु शकले त्यामुळे आई - वडील व सासरचा सांभाळ करण्याची दुहेरी जबाबदारी माज्यावर आहे, ती मी पेलेल असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे़
-शकुंतला गोबाडे- देवतूळे, रा.साळवाडी (डोरली)