शेतजमिनीच्या वादातून पित्याचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 04:37 PM2018-10-25T16:37:32+5:302018-10-25T16:40:05+5:30
शेतजमीन नावावर न केल्याने पित्याचा गळ्यावर कत्तीने वार करून खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप
नांदेड : शेतजमीन नावावर न केल्याने पित्याचा गळ्यावर कत्तीने वार करून खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश एस़एस़ तोडकर यांनी सुनावली़ हा निर्णय जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दिला़
अर्धापूर तालुक्यातील कामठा बु़ येथे मारोती नागोबा साखरे (वय ७२) यांच्या नावे ५० गुंठे जमीन आहे़ ही जमीन आपल्या नावे करावी असा आग्रह मारोती साखरे यांचा मुलगा संभाजी साखरे याने अनेक दिवसांपासून केला होता़ मात्र वडीलांनी तो आग्रह पूर्ण केला नाही़ मारोती साखरे हे किरकोळ आजारावर गावात पारंपरिक पद्धतीने उपचार करायचे़ त्यातून त्यांना काही पैसे मिळायचे़ मुलगा संभाजीने तो व्यवसाय मी करतो, मला माहिती दे अथवा जमीन नावे करण्याची मागणी केली होती़ याच कारणावरून पिता-पूत्रात अनेकदा वादही होत होते़
१९ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १० च्या सुमारास वडील मारोती आणि मुलगा संभाजी हे दोघेच घरी होते, इतर कुटुंबीय घरी नसल्याची संधी साधून मुलाने वडिलास लाथाबुक्क्याने मारहाण केली़ तसेच कत्तीने गळ्यावर वार करून त्यांचा खून केला़ या घटनेत मारोती साखरे हे जागीच ठार झाले होते़ या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय डोंगरे यांनी केला़ त्यांना पो़नाक़ळके, प्रकाश कर्दनवार, पोहेकॉ नईम, सपोनि मांजरमकर यांनी सहकार्य केले़ या प्रकरणात ११ साक्षीदार तपासण्यात आले होते़ सरकार पक्षातर्फे अॅड़ संजय लाठकर यांनी बाजू मांडली़ तर आरोपीची बाजू अॅड़ प्रवीण आयाचित यांनी मांडली़