सासूकडून सुनेचा भोसकून खून
By admin | Published: April 30, 2017 12:22 AM2017-04-30T00:22:27+5:302017-04-30T00:22:27+5:30
वालोपे येथील घटना; सुरीने छातीवर सपासप ३० वार
चिपळूण : तालुक्यातील वालोपे-देऊळवाडी येथे सासूनेच सुनेच्या छातीत सुरीने २५ ते ३० सपासप वार करुन भोसकून खून केला.
हा खळबळजनक प्रकार शनिवारी सकाळी ९.३0 वाजण्याच्या सुमारास घडला. परी प्रशांत करकाळे (वय २४) असे या दुर्दैवी सुनेचे नाव असून, तिची सासू रेणुका नामदेव करकाळे (५०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हुंड्यासाठी हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वालोपे परिसरात खळबळ उडाली आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाघझरी येथील करकाळे कुटुंब गेली काही वर्ष वालोपे-देऊळवाडी येथे भाड्याने राहत असून, या कुटुंबात परी ही पती, सासू, सासरे, दीर आणि तिची दोन लहान मुले यांच्यासह राहत होती. सासू-सुनेमध्ये सातत्याने खटके उडत असत. या कटकटीला कंटाळून सासरे नामदेव करकाळे हे शुक्रवारी दुपारी ३ नंतर जानवळे (ता. गुहागर) येथे मेहुण्यांकडे गेले होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे पती प्रशांत आणि त्याचा भाऊ आपापल्या कामावर निघून गेले. त्यावेळी दोन लहान मुले, सासू व सून असे चौघेजण घरी होते. नेहमीप्रमाणे सासू व सुनेमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्या रागातून सासू रेणुकाने परीच्या छातीवर धारदार सुरीने सपासप २५ ते ३० वार केले. हे वार इतके जबरी होते की परी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाली. तिच्या मानेवरही वार करण्यात आले आहेत. छातीवरील दोन वार (पान १० वर)खोलवर गेल्याने तिचा मृत्यू झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी घटनास्थळीच मृतदेहाची तपासणी करून तिला मृत घोषित केले.
वालोपेचे पोलिसपाटील बाळकृष्ण भिकू कदम यांनी सकाळी पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून याबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहा. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, सहा. पोलिस निरीक्षक बडेसाहब नायकवडी, पोलिस उपनिरीक्षक सचिन शेळके याशिवाय महिला व पुरुष पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
परी करकाळेचे माहेर नांदेड जिल्ह्यातील देगळूर तालुक्यातील करडखेडवाडी येथे असून, पोलिसांनी तिच्या घरी रामराव शिंदे यांच्याकडे संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. परीचा पती व दीर यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यानंतर जानवळे येथे गेलेले सासरे नामदेव याला आणण्यासाठी पोलिस गेले. या खुनाचे कारण अस्पष्ट असले तरी हुंडाबळीतून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सुरी व आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले असून, रेणुका करकाळे हिला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)
परीच्या घरचे निघाले
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर नांदेडहून परीच्या माहेरची मंडळी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी चिपळूणकडे निघाले आहेत. कामथे उपजिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले.
लहानग्यामुळे झाला खुनाचा उलगडा
आपल्या जन्मदात्या आईचा खून होत असताना साडेचार वर्षांचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी जिवाचा आकांत करीत होते. त्यातील एकाने शेजारी जाऊन आपल्या आईला आजी मारत असल्याचे सांगितले. त्यातून त्या खुनाबाबत माहिती बाहेर आली व तत्काळ शेजाऱ्यांनी पोलिसपाटलांना बोलाविले.
त्यामुळे पोलिसांना बोलविणे सहज शक्य झाले. खुनानंतरही सासू, पती व दीर हे तिघे निर्विकारपणे पोलिसांसमोर वावरत होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काय झाले आहे, हे काहीच न कळलेली दोन लहान मुले आपल्या शेजारच्या घरात शांतपणे बसली होती.
रेणुकाने दिली
खुनाची कबुली
लहान मुलांची अंघोळ झाल्यानंतर त्यांना कपडे घालण्यावरून या दोघींमध्ये भांडण झाले आणि ते वाढत गेले. आपण परीला मारले असल्याची कबुली रेणुका करकाळे हिने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.