सोयाबिनवर रोग पडलाय; चिंता नको, मदतीसाठी नांदेड जिल्ह्याने मागितले ७९ कोटी

By प्रसाद आर्वीकर | Published: November 30, 2023 03:38 PM2023-11-30T15:38:42+5:302023-11-30T15:38:53+5:30

रोगाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष किती नुकसान आहे, याची तपासणी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

Soybean is infected; Don't worry, Nanded district has asked for 79 crores for help | सोयाबिनवर रोग पडलाय; चिंता नको, मदतीसाठी नांदेड जिल्ह्याने मागितले ७९ कोटी

सोयाबिनवर रोग पडलाय; चिंता नको, मदतीसाठी नांदेड जिल्ह्याने मागितले ७९ कोटी

नांदेड : पिवळ्या मोझॅक या विषाणूजन्य रोगाने ९३ हजार ६८६ हेक्टरवरील सोयाबीनचे बाधित झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ७९ कोटी ६३ लाख रुपयांची मागणी महसूल प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.

सोयाबीन हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. यावर्षीच्या खरीपात शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यात सोयाबीनचे नुकसान झाले. जे पीक बचावले होते त्या पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कंधार, लोहा, नांदेड, नायगाव या तालुक्यांमधील सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग पडला होता. त्याचप्रमाणे खोडकुज आणि मुळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक भागात सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट निर्माण झाली आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

रोगाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष किती नुकसान आहे, याची तपासणी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. पिवळा मोझॅक आणि खोडकूज, मुळकुज या तीनही रोगांमुळे ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक बाधित झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ६३ लाख ३१ हजार रुपये निधी लागणार असून त्याची मागणी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. पिवळा मोझॅक व बुरशीजन्य रोगांमुळे बाधित झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रशासनाच्या या मदतीची प्रतीक्षा लागली आहे.

कंधार लोहामध्ये सर्वाधिक नुकसान
कंधार तालुक्यातील १२३ गावांमध्ये सोयाबीनचे पीक प्रादुर्भावग्रस्त झाले आहे. २३ हजार ४०० हेक्टर क्षेत्र बाधित म्हणून प्रशासनाने नोंद घेतली आहे. तर लोहा तालुक्यातील १२६ गावांमध्ये ४४ हजार २२४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन प्रादुर्भावग्रस्त झाले आहे.

दोन लाख ११ हजार शेतकऱ्यांना फटका
सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कंधार तालुक्यातील ३७ हजार ६००, लोहा तालुक्यात ७२ हजार, नांदेड २६ हजार ८४०, मुदखेड २१ हजार ८२ आणि नायगाव तालुक्यात ५३ हजार ९२७ अशा २ लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या मदतीची मागणी प्रशासनाने नोंदविली आहे.

कोणत्या तालुक्यासाठी किती मागितला निधी?
कंधार: १९.८९
लोहा: ३७.५९
नांदेड: ०३.९८
नायगाव: ०३.०२
( निधी कोटीत )

 

Web Title: Soybean is infected; Don't worry, Nanded district has asked for 79 crores for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.