ई-पीक पाहणी माहिती ॲपद्वारे नोंदविण्यासाठी मंगळवारी विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:40+5:302021-09-21T04:20:40+5:30
महसूल व वन विभागाचा शासन निर्णय ३० जुलै २०२१ नुसार ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यात राबविण्यात येत आहे. ...
महसूल व वन विभागाचा शासन निर्णय ३० जुलै २०२१ नुसार ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी, पूर, कोरोना महामारी व उशिराच्या माॅन्सूनमुळे पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागील एक महिन्यात १ लाख शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा पीकपेरा मोबाईल ॲपद्वारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी २१ सप्टेंबर २०२१ रोजी मोहिमेवर भर दिला आहे. या मोहिमेची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ५५६ गावे ऑनलाईन असून प्रत्येक गावातील किमान २०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत असलेल्या दिनांक इतक्या संख्येत म्हणजेच २ लाख १० हजार ९२१ इतक्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तालुकानिहाय गावांची संख्या व उद्दिष्ट निश्चित केले आहे.
अर्धापूर तालुक्यात ६४ गावे आहेत. प्रत्येक गावासाठी १० किंवा उद्दिष्टानुसार कमी अधिक याप्रमाणे स्वयंसेवकांची संख्या निश्चित केली आहे. याप्रमाणे एकूण ६४० स्वयंसेवकांमार्फत हे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. प्रत्येक स्वंयसेवकाने २० शेतकऱ्यांची नोंदणी केल्यास पूर्ण होणारे काम १२ हजार ८०० याप्रमाणे होईल. याच धर्तीवर उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, नायगाव, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, लोहा, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती केली जात आहे. तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकाची निवड करून त्यांचे सहाय्य गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांना मास्टर ट्रेनर्स मार्फत ‘ई-पीक पाहणी’ ॲपचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या सर्व टिमबद्दल विश्वास व्यक्त करून या मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करू, असे स्पष्ट केले.