मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:49 AM2019-02-23T11:49:37+5:302019-02-23T11:57:46+5:30

गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे.

Special campaign for voter registration today and tomorrow across the state | मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम

मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम

Next
ठळक मुद्देनोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधीग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना

नांदेड : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी आज  23 व रविवार दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. 

दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही दोन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 6, 7, 8 व 8अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.

सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील नागरी कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळविले आहे.

या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहायकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन  राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.

मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.

Web Title: Special campaign for voter registration today and tomorrow across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.