जनसंपर्क असणाऱ्यांचे विशेष सर्वेक्षण; कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:05 AM2020-11-22T11:05:00+5:302020-11-22T11:05:01+5:30
दुसरी लाट येण्यामध्येही सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्वाची भूमिका बजावू शकतात
नांदेड : कोरोनाची दुसरी लाट जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी सर्वांनाच विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रशासनानेही पुन्हा लाट येवू नये यासाठी उपाययोेजना करण्यास सुरुवात केली आहे. विविध व्यावसायाच्या निमित्ताने जनसंपर्क तसेच सामाजिक संपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. दुसरीकडे आरोग्य व्यवस्थाही सज्ज ठेवण्यात येत आहे.
दुसरी लाट येण्यामध्येही सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्वाची भूमिका बजावू शकतात हे लक्षात घेवून प्रशासनातर्फे किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे छोटे-मोठे विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स आदींचे सर्वेक्षण करुन त्यांची प्राधान्याने कोविड तपासणी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. याबरोबरच घरगुती काम करणाऱ्या व्यक्ती, मजूर, वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर, हाऊसिंग सोसायटीमधील सुरक्षा रक्षक तसेच आवश्यक सेवा परविणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांचे सर्वेक्षण करुन काेविड तपासणी करण्याचा व काेविडचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दुसरीकडे रुग्ण सेवा सुरळित मिळावी यासाठीही आढावा घेवून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.यासाठीची कृती योजना तयार करण्यात आली आहे. कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी प्रयोगशाळा नमुन्यामधील पॉझिटिव्ह रुग्णांचे शेकडा प्रमाण किती आहे यानुसार सतर्कतेचे इशारे लक्षात घेवून त्यानुसार रुग्णोपचार सुविधा कार्यान्वित करण्यास सांगण्यात आले आहे.
फ्ल्यूसदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण
दुसरी लाट येवू नये असा प्रयत्न आहे. या अनुषंगाने फ्ल्यूसदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत फिवर क्लिनीक यांची या सर्वेक्षणात महत्वाची भूमिका आहे. याबरोबरच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमंतर्गत ग्रामीण भागातील प्राथिमक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडून इन्फ्ल्यूंझा सदृश्य रुग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकन नियमितपणे होवून साप्ताहिक ट्रेंड समजावून घेण्यात येत आहे. याच पद्धतीचे सर्वेक्षण शहरी भागात मनपातर्फे करण्यात येत आहे. तसेच गृहभेटीद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
औषधांचा बफर स्टॉक ठेवण्याचे निर्देश
कोविडचा प्रादुर्भाव ज्या कालावधीमध्ये सर्वाधिक होता त्यावेळी लागणारी औषधे आणि साधन सामुग्री लक्षात घेवून त्याच्या किमान ५० टक्के औषधे नेहमी उपलब्ध असतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पुढील १५ दिवसांचा औषध व साधन सामुग्री स्टॉक बफर स्टॉक म्हणून ठेवण्यात येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट येवूच नये यासाठी प्रशासनाबरोबच नागरिकांनीही प्रयत्न करायला हवेत. संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागासह यंत्रणा कामाला लागली आहे. नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. हातांची स्वच्छता सातत्याने करावी. तसेच दाेन व्यक्तीमध्ये शारीरिक अंतर ठेवावे.
- डॉ.विपिन इटणकर जिल्हाधिकारी, नांदेड