'स्वारातीम' विद्यापीठाचा परीक्षा विभाग झाला हायटेक; उत्तरपत्रिकांची होतेय ऑनलाइन तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:47 IST2025-04-19T14:47:10+5:302025-04-19T14:47:22+5:30
तब्बल दोन लाख उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासल्या जात आहेत.

'स्वारातीम' विद्यापीठाचा परीक्षा विभाग झाला हायटेक; उत्तरपत्रिकांची होतेय ऑनलाइन तपासणी
नांदेड : येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा परीक्षा विभाग आता शत प्रतिशत ऑनलाइन झाला आहे. विद्यापीठात आता परीक्षा ऑफलाइन होतात. मात्र, या परीक्षांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी ही ऑनलाइन होत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर काही अभ्यासक्रमांसाठी हा प्रयोग करण्यात आला होता; पण आता मात्र सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर लागण्याची सोय झाली आहे. तब्बल दोन लाख उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासल्या जात आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली की उत्तर पत्रिकांचे गट्ठे तयार केले जायचे. मग या उत्तर पत्रिका प्राध्यापक मंडळी नेमून दिलेल्या जागी बसून तपासायचे. यात अनेकदा उत्तरपत्रिका पाने एकमेकांना चिकटून तपासायचा राहून जायच्या यातून वाद व्हायचे. शिवाय या सर्व प्रक्रियेत उशीर होऊन परीक्षांचे निकाल वेळेवर लागायचे नाहीत. परिणामी ज्या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठात प्रवेश घ्यायचे आहेत त्यांना अडचणी निर्माण व्हायच्या. परंतु, आता मात्र उत्तरपत्रिका तपासण्याची पद्धतच ऑनलाइन केल्यामुळे विद्यापीठ परीक्षेत्रातील परीक्षांचे निकाल वेळेवर लागणे शक्य झाले आहे.
उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया
विद्यापीठात उत्तर पत्रिका आल्यावर त्या सर्व स्कॅन केल्या जातात. त्यानंतर त्या सर्व्हरवर अपलोड केल्या जातात. निवडक ४८ केंद्रांवर प्राध्यापक या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासतात. पहिले पान तपासल्यावरच पुढेच पान उघडते, विद्यार्थ्यांची माहिती असलेले पान स्कॅन न होता त्यावर क्यूआर कोड लावला जातो. त्यानंतर तपासलेल्या उत्तरपत्रिकेचे गुण थेट मार्कमेमोवर जातात.
उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणी
ऑफलाइन पद्धतीमध्ये अनेक दोष होते. निकाल लागल्यावर बराच काळ उत्तरपत्रिका सांभाळून ठेवाव्या लागत होत्या. त्यातही जर विद्यार्थ्याने फेरतपासणीची मागणी केली तर त्याची उत्तरपत्रिका शोधण्यासाठी वेळ लागत असे; पण आता सर्व उत्तरपत्रिका स्कॅन केल्याने एका क्लिकवर कुणाचीही उत्तरपत्रिका सापडू शकते.
- खुशाल सिंह साबळे, परीक्षा नियंत्रक, स्वारातीम विद्यापीठ