SSC Result: नांदेडमध्ये दहावीच्या निकालाचा टक्का वाढला; जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल
By प्रसाद आर्वीकर | Published: May 27, 2024 04:07 PM2024-05-27T16:07:09+5:302024-05-27T16:08:51+5:30
दहावीच्या निकालात मुलींच आघाडीवर आहेत
नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ९०.३९ टक्के लागला होता. यावर्षी ३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातून यावर्षी ४५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४२ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९९ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील १७ हजार ८१२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. १३ हजार ६४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८३९० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २५११ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. १४९ विद्यार्थ्यांनी खासगी पद्धतीने परीक्षा दिली होती. त्यापैकी १२१ विद्यार्थी (८१.२० टक्के) उत्तीर्ण झाले. तर ७७७ विद्यार्थ्यांनी फेर परीक्षा दिली होती. त्यापैकी ४५६ विद्यार्थी (५८.६८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालात मुखेड तालुका आघाडीवर
दहावीच्या निकालात जिल्ह्यात मुखेड तालुका आघाडीवर आहे. या तालुक्याचा ९८.४० टक्के एवढा सर्वाधिक निकाल लागला आहे. बिलोली तालुक्याचा ९६.६० टक्के, नायगाव तालुक्याचा ९६.५७ टक्के, कंधार तालुक्याचा ९६.४८ टक्के, लोहा ९५.७८ टक्के, अर्धापूर ९५.३१ टक्के, देगलूर ९४.८८ टक्के, उमरी ९३.७६ टक्के, धर्माबाद ९३.४२ टक्के, किनवट ९२.३७ टक्के, भोकर ९२.३० टक्के, नांदेड ९३.२० टक्के, हदगाव ९०.९८ टक्के, मुदखेड ९०.५१ टक्के, माहूर ८७.५६ टक्के आणि हिमायतनगर तालुक्याचा ८६.८५ टक्के निकाल लागला आहे.
दहावीतही मुलींची बाजी
बारावी परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात २१ हजार ५०२ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार २८३ मुलींनी परीक्षा दिली. २० हजार ४३४ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०१ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.१८ टक्के एवढे आहे. मुलींनी यावर्षीही निकालात बाजी मारली आहे.
१९७ शाळांचा निकाल १०० टक्के
जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील एकूण शाळांपैकी १९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर कंधार तालुक्यातील झेड.पी. हायस्कूल या एकमेव शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.या शाळेतून दहावी परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याने अर्ज केला होता. मात्र त्यानेही परीक्षा दिली नाही. परिणामी शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.