ST Strike : भोकरमध्ये दोन बसवर दगडफेक; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:39 AM2018-06-08T11:39:34+5:302018-06-08T14:49:34+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे.
भोकर (नांदेड) : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. या संपाला भोकर तालूक्यात हिंसक वळण लागले असून दोन बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसच्या काचा फुटल्याअसून कोणासही इजा झाली नाही.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. या संपाला संमिश्र प्रतिसाद असून काही आगाराच्या गाड्या रस्तावर आहेत. आज सकाळी ८ वाजता भोकर आगारातून भोकर - नांदेड ही बस (क्र.एम.एच.०६ एस ८७६३) प्रवास्यांना घेऊन निघाली. बस भोसी जवळ आली असता अज्ञात आंदोलकाकडून बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसच्या पाठीमागील बाजूची काच फुटली.
दुसऱ्या एका घटनेत हदगाव आगाराच्या भोकर - हदगाव या बसवर (क्र. एमएच २० डी ९८१७) भोकर शहरात अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. यात बसची समोरची काच फुटली. दोन्ही घटनेत कोणासही इजा झाली नाही.
संपाचे चित्र अद्याप स्पष्ट नाही
सकाळ पासून भोकर आगारातील लातूरच्या ६ व ६.४० वाजताच्या दोन फेऱ्या वगळता सर्व फेऱ्या नियमीत चालू आहेत. या अघोषित संपात किती कर्मचारी सहभागी आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रवाशांच्या सोईसाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
- पि.एस.पावरा, आगार प्रमुख, भोकर.