ग्रामीण भागात एसटी सुसाट; ५८ बसेस मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:41+5:302021-09-02T04:39:41+5:30
ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना पहाटे लवकर तालुका, बाजारपेठेच्या ठिकाणी जाणे सोईचे व्हावे या उद्देशाने एसटी महामंडळाच्या बसेस काही गाव-खेड्यात ...
ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना पहाटे लवकर तालुका, बाजारपेठेच्या ठिकाणी जाणे सोईचे व्हावे या उद्देशाने एसटी महामंडळाच्या बसेस काही गाव-खेड्यात मुक्कामी पाठविण्यात येतात. रात्रीला प्रवासी घेऊन त्याच गावात मुक्काम केला जातो. ही बस पहाटे लवकरच प्रवासी घेऊन गावातून निघते. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांना सोईचे होते.
ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना
खासगी ट्रॅव्हल्स आणि काळीपिवळीचे वाढलेले भाडे पाहता बहुतांश प्रवासी एसटी महामंडळाच्या बसेसला पसंती देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसलादेखील तुडुंब गर्दी होत आहे. त्यात सध्या सणांचे दिवस सुरू झाल्याने गर्दी वाढली आहे.
गाडी मुक्कामी येत असल्याने प्रवासी सुखावले
गावातून भोकर येथे अपडाऊन करतो. दुकानावर काम करत असताना सकाळी १० वाजेपर्यंत भोकरला जावे लागते तर रात्रीला दुकानातून उशीर होतो. त्यामुळे भोकर येथून सुरू असलेली मुक्कामी गाडी अपडाऊनसाठी सोईची झाली आहे.
- तुकाराम बासटवाड, प्रवासी
वाडीतून किनवटला ये-जा असते. कॉलेजच्या कामानिमित्त दररोजच जावे लागते. बस सुरू नसल्याने दुचाकीवरून अपडाऊन करावे लागत असते. आता मुक्कामी गाडी सुरू झाल्याने बसनेच ये-जा करत आहे. पावसाळ्यात होणारा त्रास बंद झाला आहे.- सुजय कदम, प्रवासी
मुक्कामी जाणाऱ्या १३ गाड्यांचे काय?
नांदेड विभागातून ७१ बसेस विविध गाव, वाडी, वस्तीवर मुक्कामी असतात. त्या पहाटेच प्रवाशांना घेऊन शहराकडे धावतात. परंतु, आजही जिल्ह्यातील १३ बसेस बंद असून, तेथील प्रवाशांना बस कधी सुरू होणार, असा प्रश्न पडला आहे.
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल
नांदेड विभागातून जवळपास राज्य व जिल्हा मार्गावर धावणाऱ्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. नांदेड आगारातून लातूरकडे धावणाऱ्या बसेसला सर्वाधिक प्रवासी मिळत असल्याने बसेस फुल्ल भरून धावताहेत. ग्रामीण भागात बसफेऱ्यांना सणासुदीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यात कोराेना नियमांचे पालन गरजेचे आहे.