जलशुद्धीकरण केंद्रांच्या स्वच्छतेला झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:58 AM2019-02-10T00:58:18+5:302019-02-10T00:58:34+5:30

शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो.

Start of cleaning of water purification centers | जलशुद्धीकरण केंद्रांच्या स्वच्छतेला झाला प्रारंभ

जलशुद्धीकरण केंद्रांच्या स्वच्छतेला झाला प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका : तीन वर्षानंतर केली जाते स्वच्छता

नांदेड : शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो.
शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ५ जलशुद्धीकरण केंद्र आहेत. या शुद्धीकरण केंद्रात गोदावरी नदी तसेच सांगवी बंधाऱ्यातून पाणी घेतले जाते. या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन पाणी शहरातील विविध भागांत असलेल्या जलकुंभात पुरवठा केला जातो. त्यानंतर विविध भागात हे पाणी पिण्यासाठी पुरवले जाते. शहरात काबरानगर येथे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये एक ६० दशलक्ष लिटर आणि दुसरे शुद्धीकरण केंद्र हे ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे आहे. दक्षिण नांदेडला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असदवन येथेही ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. सिडको येथेच १२.०६ दशलक्ष लिटर क्षमतेचे केंद्र आहे. तसेच नवीन डंकीन पंपहाऊस येथेही २७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या केंद्रातून पाणी शुद्ध करुन शहराला पुरवले जाते.
या जलशुद्धीकरण केंद्रामधील गाळ काढण्याचे काम महापालिकेने ७ फेब्रुवारीपासून हाती घेतले आहे. जवळपास फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. पूर आल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात येणारा गाळ मोठ्या प्रमाणात साचला जातो. हा गाळ काढून जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालावे यासाठी दर दोन ते तीन वर्षांनी हा गाळ काढला जातो, अशी माहिती उपअभियंता संघरत्न सोनसळे यांनी दिली. जवळपास १० लाख रुपये या कामासाठी खर्च केले जाणार आहेत.
शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या स्वच्छता कामामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या स्वच्छतेदरम्यान पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठा विभागाने केली आहे.
दरम्यान, आयुक्त लहुराज माळी यांनी शहरातील पंपगृहाच्या पाहणीदरम्यान पाणीपुरवठा विभागाला अनेक सूचना केल्या आहेत. असदवनकडे जाणा-या जलवाहिनीची गळती सुरू आहे. ती तत्काळ रोखावी, अशी सूचना त्यांनी केली.
शहरालगतच्या हातपंपांचीही दुरुस्ती करण्याचे निर्देश
शहरात असलेल्या हातपंप आणि पॉवरपंप दुरुस्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. ७१० हातपंपांपैकी दक्षिण नांदेडातील १९८ आणि उत्तर नांदेडातील ७२ हातपंपांच्या दुरुस्तीचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

Web Title: Start of cleaning of water purification centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.