हार्ट सर्जरीनंतर व्यायाम सुरु केला; मात्र मॉर्निंग वॉक करताना अपघातात जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:12 PM2023-06-02T13:12:00+5:302023-06-02T13:12:45+5:30
हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तविली आहे.
हदगाव : हार्ट सर्जरीनंतर डॉक्टरांनी मॉर्निंग वॉक करण्याचे सुचवल्याने पहाटेच घराबाहेर पडलेल्या जेष्ठ नागरिकाचा मनाठा येथे अपघातीमृत्यू झाला. उत्तम नागोराव शिंदे (६४) असे मृताचे नाव आहे़.
मनाठा येथील उत्तम नागोराव शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हार्ट सर्जरी झाली. प्रकृती चांगली रहावी म्हणून डॉक्टरांनी त्यांना मॉर्निंग वॉक करण्याचे सुचवले आहे. त्यामुळे शिंदे यांनी रोज पहाटे घराबाहेर जात वॉक आणि व्यायाम सुरु केला. दरम्यान, आज पहाटे ५ वाजता देखील शिंदे पत्नी आणि एका मित्र दामोदर आडेसोबत घराबाहेर पडले. एमएसईबीच्या कार्यालयासमोर दोघे मित्र व्यायाम करत होते. याचवेळी मनाठा गावाकडे येणाऱ्या एका भरधाव चारचाकीने शिंदे यांना जोरदार धडक दिली. धडकेत शिंदे ३०-४० फुट दूर फेकले गेले. पुतण्या सुहास शिंदे व मुलगा विशाल शिंदे यांनी गंभीर जखमी शिंदे यांना नांदेडच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून शिंदे यांना मृत घोषीत केले
दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांनी वर्तविली आहे. माहिती मिळताच मनाठा पोलीसांनी चारचाकीचा शोध घेतला मात्र गाडी आढळून आली नाही. मृताच्या पश्चात दोन मुले, तीन मुली सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.