नांदेडमध्ये राज्य हौशी नाट्य स्पर्धेची शुक्रवारपासून मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:24 PM2019-11-13T14:24:06+5:302019-11-13T14:27:51+5:30
नांदेडमध्ये प्राथमिक फेरी रंगणार
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ५९ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन नांदेड येथील कुसूम सभागृहात करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून येणाऱ्या कलाकारांतर्फे १६ नाटकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ‘शेवंता जीती हाय’ या नाटकाने प्रारंभ होणार आहे. यश चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्यावतीने सादर करण्यात येणाऱ्या या नाटकाचे लेखक प्रल्हाद जाधव असून दिग्दर्शन सुनील ढवळे करणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या ज्ञान संस्कृती सेवाभावी संस्थेच्यावतीने नाथा चितळे लिखित आणि भीमाशंकर कुलकर्णी दिग्दर्शक असलेले सिस्टीम क्रॅश हे नाटक सादर होणार आहे. १७ रोजी नांदेडच्याच संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने सुनील देव दिग्दर्शीत आणि शंकर शेष लिखित ‘आणखी एक द्रौणाचार्य’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. १८ रोजी नांदेडच्या सांस्कृतिक मंचतर्फे रवी शामराज दिग्दर्शीत आणि अमेय दक्षिणदास लिखित ‘द कॉन्शन्स’ तर १९ रोजी नांदेडच्या सरस्वती प्रतिष्ठानतर्फे ‘कळा या लागल्या जीवा’ हे नाटक सादर होणार आहे. किरण पोत्रेकर हे नाटकाचे लेखक असून दिग्दर्शन डॉ. उमेश अत्राम करणार आहेत.
२० नोव्हेंबर रोजी परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमतर्फे ‘ एक जांभूळ अख्यान’ हे नाटक सादर होणार आहे. नागेश कुलकर्णी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून रामदास कदम नाटकाचे लेखक आहेत. २१ नोव्हेंबर रोजी जिंतूर येथील नटराज कला विकास मंडळातर्फे अतुल साळवे दिग्दर्शीत ‘वाडा’ नाटक सादर केले जाणार आहे. तर २२ रोजी नांदेडच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्यावतीने सचिन केरुरकर दिग्दर्शीत ‘पुष्पांजली’ नाटक सादर केले जाणार आहे. २३ रोजी परभणीच्या क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विनोद डावरे दिग्दर्शीत ‘अस्वस्थ वल्ली’ तर २४ नोव्हेंबर रोजी नांदेडच्या जयस्वाल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने वसंत कानिटकर लिखित आणि डॉ. सुरेश पुरी यांचे दिग्दर्शन असलेले ‘मत्स्यगंधा’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
२५ रोजी ‘आमचं जमलय, तुमचं काय’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील बोरी येथील जय शिवराय सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सादर केल्या जाणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन श्याम जाधव हे करणार आहेत. २६ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नांदेड शाखेच्यावतीने नाथा चितळे लिखित आणि अपर्णा नेरलकर दिग्दर्शीत ‘चिऊचे घर मेणाचे’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. २७ रोजी नांदेडच्या ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने राहूल जोंधळे लिखित ‘निळी टोपी’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे तर २८ रोजी परभणी जिल्ह्यातील उखळी येथील छत्रपती सेवाभावी संस्थेच्यावतीने ‘नजरकैद’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
२९ नोव्हेंबर रोजी सृजनमयसभा तर ३० नोव्हेंबर रोजी ‘अंधारयात्रा’ नाटकाने स्पर्धेचा समारोप होणार आहे. सृजनमयसभा नाटक परभणीच्या बालगंधर्व सांस्कृतिक कला व क्रीडा युवक मंडळातर्फे सादर केले जाणार आहे. रविशंकर झिंगरे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तर ‘अंधारयात्रा’ नाटक नांदेडचा तन्मय ग्रूप सादर करणार असून याचे लेखन आणि दिग्दर्शन नाथा चितळे यांनी केले आहे.