प्रदेश भाजपला नांदेडची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:27 AM2018-07-03T00:27:03+5:302018-07-03T00:27:59+5:30

महानगरपालिका निवडणुकीत सर्व ताकद लावल्यानंतरही सपाटून मार खाल्लेल्या भाजपाची गाडी रुळावर यायला तयार नाही. मागील वर्ष-दीड वर्षांत संघटनात्मक बांधणी करण्यात जिल्ह्यात भाजपाला अपयश आले आहे. त्यातच निवडणूक तयारी झालेली नसतानाच जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या ९ विस्तारकांनाही हटविण्यात आल्याने येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाचे काय होणार? अशी चिंता आता पक्षश्रेष्ठींना सतावत आहे.

State BJP concerns Nanded | प्रदेश भाजपला नांदेडची चिंता

प्रदेश भाजपला नांदेडची चिंता

Next
ठळक मुद्देसंघटनात्मक बांधणीत अपयश : निवडणूक तयारीविनाच जिल्ह्यातील नऊ विस्तारकांना नारळ

विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महानगरपालिका निवडणुकीत सर्व ताकद लावल्यानंतरही सपाटून मार खाल्लेल्या भाजपाची गाडी रुळावर यायला तयार नाही. मागील वर्ष-दीड वर्षांत संघटनात्मक बांधणी करण्यात जिल्ह्यात भाजपाला अपयश आले आहे. त्यातच निवडणूक तयारी झालेली नसतानाच जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या ९ विस्तारकांनाही हटविण्यात आल्याने येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाचे काय होणार? अशी चिंता आता पक्षश्रेष्ठींना सतावत आहे.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी होऊन साधारणत: आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपा पक्षश्रेष्ठींनी विशेष लक्ष देवून मोठी कुमक नांदेडमध्ये पाठवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी त्यावेळी नांदेडमध्ये तळ ठोकला होता. मात्र त्यानंतरही पक्षाला महापालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीनंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी होईल, असे अपेक्षित होते. मात्र निष्ठावंत आणि दुसºया पक्षातून भाजपात आलेल्यांतील संघर्ष चालूच राहिल्याने एकसंघ भाजपा उभी राहण्यास अडथळे निर्माण झाले. पर्यायाने पक्षश्रेष्ठींचाही कानाडोळा झाल्याने खुद्द पक्षातील कार्यकर्त्यांतच नाराजी आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी करण्याच्या हेतूने प्रदेश भाजपाने ‘वन बुथ-२५ युथ’ ही संकल्पना मांडली आहे. याबरोबरच ‘वन पेज’ या संकल्पनेआधारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे निश्चित केले आहे. मात्र ‘वन बुथ’ योजनेचे काम इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेडमध्ये झाले नाही. त्याचप्रमाणे ‘वन पेज’ संकल्पनाही कागदावरच राहिल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी प्रदेश भाजपाने राज्यभरात विधानसभा क्षेत्रनिहाय विस्तारकांची नियुक्ती केली होती.
नांदेड जिल्ह्यातही अशाच पद्धतीने विधानसभा क्षेत्रनिहाय ९ विस्तारक नेमण्यात आले होते. बाहेरच्या विधानसभा क्षेत्रातील हा विस्तारक त्याला नेमून दिलेल्या विधानसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीसाठी आवश्यक असणाºया तयारीची कामे प्रामुख्याने पाहणार होता. या विस्तारकांच्या संपर्कात थेट प्रदेश भाजपा होती. विस्तारकांच्या कामकाजाचा प्रदेश भाजपाने नुकताच आढावा घेतला असता नांदेड जिल्ह्यात निवडणुकांच्या अनुषंगाने अत्यल्प काम झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, नांदेडसह राज्यभरातील विस्तारकांना आता काम थांबविण्यास सांगण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांत निवडणूक तयारीची कामे पूर्ण झाली आहेत. तर नांदेडमध्ये मात्र निवडणूक तयारीची कामे अर्धवट असतानाच विस्तारकांची पदे गुंडाळल्याने आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांना पक्ष कसा सामोरे जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, या नऊही विस्तारकांना पक्षाने संघटनात्मक कामासाठी दिलेली वाहने जमा करण्यास सांगण्यात आले आहे. ९ विस्तारकांनी जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार काम केले. मात्र त्यांना भाजपाच्या स्थानिक पदाधिकाºयांकडून आवश्यक ते सहकार्य न लाभल्याने जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीचे तसेच निवडणूक तयारीचे काम होऊ शकले नाही, असे या विस्तारकांनीच पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे समजते.
---
'वन पेज' कागदावरच !
प्रदेश भाजपाने खास निवडणुकीसाठी ‘वन पेज’ संकल्पनेनुसार सर्व विधानसभा क्षेत्रात काम सुरु केले आहे. कागदाच्या एका पानावर ६० मतदारांची नावे लिहून द्यायची आणि हा कागद कार्यकर्त्याकडे सुपूर्द करायचा. संबंधित कार्यकर्त्याने आपल्या हातातील कागदावर असलेल्या मतदारांना बुथपर्यंत आणून त्यांचे मतदान करुन घ्यायचे आणि त्यानंतरच बुथ सोडायचा, अशी ही संकल्पना आहे. यासाठी पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्याच्या याद्या विस्तारकांच्या माध्यमातून करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र नांदेड जिल्ह्यात या याद्याही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. पर्यायाने भाजपाची ‘वन पेज’ योजना कागदावरच राहणार आहे.
---
सत्ता असूनही जिल्ह्यात बळ नाही
भाजपाची राज्यात तसेच केंद्रात सत्ता आहे. मात्र नांदेडसह बहुतांश जिल्ह्यांत संघटना आणि प्रशासन यांच्यात समन्वय घडविणारी कुठलीही यंत्रणा नसल्याने सत्ता असूनही पक्षाचे कार्यकर्ते पोरकेच असल्याचे दिसून येते. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने इतर प्रमुख पक्षांनी तयारी सुरु केली असताना जिल्ह्यात लोहा-कंधारमध्ये आ. प्रताप चिखलीकर, मुखेडमध्ये डॉ. तुषार राठोड यांच्यासह नायगावमधून राजेश पवार, किनवटमधून प्रफुल्ल राठोड आदी मोजकेच पदाधिकारी सक्रिय असल्याचे दिसते. इतर काही तालुक्यांत तर भाजपाचे काम सत्ता असूनही नसल्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: State BJP concerns Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.