कुस्त्यांसह रंगणार राजकीय जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:16 AM2019-01-06T00:16:08+5:302019-01-06T00:18:17+5:30
सलग तीन दिवसांची मिळालेली सुटी त्यातच कडाक्याच्या थंडीपासून मिळालेला काहीसा दिलासा यामुळे माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे़
नांदेड : सलग तीन दिवसांची मिळालेली सुटी त्यातच कडाक्याच्या थंडीपासून मिळालेला काहीसा दिलासा यामुळे माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे़ त्यातच उद्या रविवारी कुस्त्यांची प्रचंड दंगल आयोजित करण्यात आली आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावे होणार असल्याने रंगणाºया राजकीय फडाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
कडाक्याच्या थंडीत यंदा माळेगाव यात्रेचा रंग भरला आहे़ राज्याच्या कानाकोपºयातून यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक माळेगावमध्ये दाखल झाले आहेत़ पहिल्याच दिवशी पार पडलेल्या शासकीय पूजेसह देवस्वारीपूजन आणि पालखी पूजनालाही भाविकांची मोठी उपस्थिती होती़ त्यानंतर झालेल्या ग्रामीण महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला़ यात्रेचे वैशिष्ट्य असलेले कृषीप्रदर्शन शुक्रवारपासून सुरु झाले़ या प्रदर्शनाला लाखो भाविकांनी आवर्जून उपस्थिती लावून विविध स्टॉलची पाहणी केली़
शनिवारचा दिवसही भरगच्च कार्यक्रमांचा राहिला़ सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली व समाजकल्याण सभापती शीलाताई निखाते यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे उद्घाटन झाले़ या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला़ त्याचवेळी पशु, अश्व, श्वान व कुक्कुटप्रदर्शन भरविले़ या प्रदर्शनात वेगवेगळ्या जातीचे पशु-पक्षी पहायला मिळाले़
दरम्यान, रविवारी सुटीच्या निमित्ताने सहकुटुंब माळेगावला येणा-या भाविकांची संख्या वाढणार आहे़ जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी दुपारी १२ वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे़ शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे़ केवळ मराठवाड्यातीलच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपºयातून नामवंत मल्ल या फडात आपला जोर आजमावणार असल्याने या दंगलीबाबत उत्सुकता आहे़
शुक्रवारी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने यात्रास्थळी ओबीसी सत्ता संपादन मेळावा पार पडला़ त्यानंतर रविवारचा दिवस राजकीय जुगलबंदीचाही ठरणार आहे़ रविवारी भाजपाच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत धनगर आरक्षण जागर मेळावा होणार आहे़ तर राष्ट्रवादीच्या वतीने युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या पुढाकाराने धनगर आरक्षण ललकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांसह पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार आहे़
महिला बचत गटांचा खास खाद्यपदार्थ महोत्सव
- महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत माळेगाव यात्रेत जिल्हा परिषद फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
- या खाद्यपदार्थ महामेळाव्यात जिल्ह्यातून विविध महिला बचत गटांचे ८५ स्टॉल दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन स्टॉल महिला बालकल्याण विभागाचे असून ३७ स्टॉल हे खाद्यपदार्थांचे आहेत तर ४६ स्टॉल महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी आले आहेत.
- खाद्यपदार्थ महोत्सवात बेसन भाकरी, पुरीभाजी, भाजीपोळी, खिचडी, भजे, व्हेज, नॉनव्हेजचे विविध खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. पहिल्यांदाच माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
- माळेगाव यात्रेत सहभागी भाविक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी या महोत्सवात भेट देऊन महिला बचत गटांनी तयार कलेल्या खाद्यपदार्थांचा आनंद घेतला. येत्या ८ जानेवारीपर्यंत माळेगाव यात्रेत खाद्यपदार्थ महोत्सव सुरु राहणार असून यात्रेकरुंनी महिला बचत गटांच्या या महोत्सवास भेट देऊन विविध खाद्यपदार्थांचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे़