राज्य सरकारकडून विकासात भेदभाव अपेक्षित नाही - खासदार अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:21 PM2017-11-01T17:21:16+5:302017-11-01T17:24:47+5:30
महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला़ जनमताचा हा कौल स्वीकारत विकास कामासाठी राज्य सरकारने भेदभाव न करता मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.
नांदेड : महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला़ जनमताचा हा कौल स्वीकारत विकास कामासाठी राज्य सरकारने भेदभाव न करता मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली. विकासाच्या प्रश्नावर आपण लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेडच्या मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसच्या शीला भवरे या महापौर पदी तर विनय गिरडे हे उपमहापौर पदी निवडून आले. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने ७४ मते घेतली तर भाजपाला ६ मते मिळाली. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. चव्हाण यांनी शहरातील प्रमुख प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यात येईल, असे सांगितले. त्याचवेळी काँग्रेसने निवडणुकीत घोषित केलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इतकेच नव्हे तर आता प्रभागनिहाय समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात कच-याचा प्रश्न गंभीर आहे. गोदावरी नदी प्रदुषणाबाबतही मनपा लक्ष घालणार आहे. त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणा-या सहकार्याबाबत त्यांनी सरकारकडून सकारात्मक भूमिका अपेक्षित असल्याचे सांगितले. निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपआपली भूमिका मांडत असतो. निवडणुकीनंतर मात्र जनतेचा कौल स्वीकारुन विकासासाठी शासनाने सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. विकासाच्या विषयावर भेदभाव केला जाऊ नये. आपण मुख्यमंत्री असताना विकासाच्या विषयात भेदभाव केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर नांदेडच्या विकास कामासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही खा. चव्हाण यांनी सांगितले. नांदेड महापालिकेला राज्य सरकारकडून मागील तीन वर्षापासून कोणताही निधी दिला गेला नाही़ उलट महापालिकेचे अनेक प्रकल्प निधीअभावी बंद पडले आहेत़ याबाबत विचारले असता महापालिकेकडून या संदर्भातील अहवाल घेवून चर्चा केली जाईल असेही खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.