राज्यस्तरीय योग शिबिरात नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 03:25 PM2019-06-21T15:25:39+5:302019-06-21T15:30:45+5:30
या उत्साही वातावरणात सहभाग घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान नागरिकांनी मिळवला
नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. या उत्साही वातावरणात सहभाग घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याचा आनंद नांदेडकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) येथे राज्यस्तरीय योग दिनासाठी मागील दहा दिवसापासून राज्य शासनाच्या विविध आस्थापना आणि पतजंली योगपीठाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम आज भल्या पहाटे दिसून आला. नांदेड शहरातील शिबिराकडे जाणारे रस्ते वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी युवक-युवती , महिला -पुरुष, अबाल वृध्द , शिक्षकवर्ग , विद्यार्थी असे शहरी, ग्रामीण भागातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग जाणवत होता.
कार्यक्रम स्थळाकडे शिस्तबध्दरितीने लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या लोकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणातील महसूल, पोलीस, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, होमगार्ड, जिल्हा परिषद, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यासह विविध स्वंयसेवी संस्था व संघटना यांच्या स्वंयसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमस्थळी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या योग प्रात्यिक्षिकांना एका भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पांढऱ्या शुभ्र पोषाखामधील लाखों नागरिक योगासनाचे विविध प्रकार करीत होते. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, गोल्डन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे निरीक्षण आणि वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक क्षणाची नोंद घेत होते. विविध वृत्त वाहिन्यांद्वारे याचे थेट प्रसारण जगभरातील 177 देशातील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी यांची सुरु असलेली लगबग जाणवत होती.