शहर विकास समितीचे निवेदन; खड्डे बुजविण्यासाठी अभियंत्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:43+5:302021-08-27T04:22:43+5:30
छत्रपती चौक, मोर चौक, पावडेवाडी नाका ते विश्रामगृहपर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणे प्रचंड खड्डे पडलेले असून छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. ...
छत्रपती चौक, मोर चौक, पावडेवाडी नाका ते विश्रामगृहपर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणे प्रचंड खड्डे पडलेले असून छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. वर्कशॉप, श्रीनगर, तरोडा नाका या रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यामुळे छत्रपती चौक, मोर चौक, पावडे वाडी नाका ते विश्रामगृहापर्यंत पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्यावर वाहनांची वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याच रस्त्यावर अनधिकृत असलेले गतिरोधक त्वरित काढून टाकावे, अन्यथा उच्च न्यायालयाने दिलेल्या मानकाप्रमाणे गतिरोधक तयार करण्यात यावेत. नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयासमोरच रस्त्याच्या आरपार भयानक मोठा खड्डा पडलेला आहे. वाहनधारक तेथून वाहन चालवताना अतिशय मेटाकुटीस येत असून कॉलेजच्या गेट जवळ पडलेल्या खड्ड्यात रोजच अपघात होत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम तत्काळ सुरू करीत असून नागरिकांची होणारी गैरसोय लवकरच दुर करू, असे आश्वासन समितीचे अध्यक्ष नंदकुमार दुधेवार, उपाध्यक्ष रमेश गटलेवार, सचिव रामराव पाश्टे, मार्गदर्शक रामनारायण बंग, रमाकांत गंदेवार यांना दिले.