धर्माबादेत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:09+5:302020-12-05T04:28:09+5:30
बंजारा समाजाचा कार्यक्रम माहूर : बंजारा समाजाच्या वतीने उद्या ५ डिसेंबर रोजी माहूर येथे कै. ग्यानबाजी केशवे महाविद्यालयाच्या प्रांगणात ...
बंजारा समाजाचा कार्यक्रम
माहूर : बंजारा समाजाच्या वतीने उद्या ५ डिसेंबर रोजी माहूर येथे कै. ग्यानबाजी केशवे महाविद्यालयाच्या प्रांगणात लातूर विभागीय नायकीर सोगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका गोर सेनेचे अध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांनी दिली. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची आठवण करीत ५ डिसेंबर रोजी बंजारा समाज गौरव दिन म्हणून साजरा करतो. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जाधव यांनी केले.
गुरुनानक जयंती
अर्धापूर : कामठा बु. येथील बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शीख धर्माचे संस्थापक संत गुरुनानक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंघ कामठेकर, शंकर कंगारे, विश्वनाथ दासे, भीमराव गव्हाणे, सुडामन कल्याणकर, शिवदास दासे, प्रतापसिंघ कामठेकर, गंगाधर बालगे, हरजितसिंघ कामठेकर, लखनसिंघ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र जिल्हावार यांनी केले. सूत्रसंचालन अंबादास अटपलवाड यांनी केले, तर उपमुख्याध्यापक शिवानंद दासे यांनी आभार मानले.
दुगडुमवार यांना पुरस्कार
नायगाव : कुंटूर येथील कवी, लेखक डॉ. बाळू दुगडुमवार यांना रोहमारे समीक्षा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘बाबा आमटे - व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व’ या समीक्षा ग्रंथाला हा पुरस्कार कोपरगाव, जि. अहमदनगर येथील रोहमारे ट्रस्टच्या वतीने जाहीर झाला. रोख ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अध्यक्षपदी जाधव
बिलोली : बिलोली आगार स्तरावर प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी आगारप्रमुख समर्थवाड, स्थानकप्रमुख इंगोले, राजेश कदम उपस्थित होते. यावेळी प्रवासी संघटनेच्या अध्यक्षस्थानी समाधान जाधव, उपाध्यक्षपदी सायलू नरोड, सचिवपदी संतोष उत्तरवाड, तर सदस्यपदी राजकुमार वाळवे यांची निवड झाली.
क्रीडा संकुल काम वेगात
धर्माबाद : येथील क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते खेळाडूंसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार यांनी दिली. यावेळी तालुका क्रीडाधिकारी किशोर पाठक, किनवटचे कृष्णा परीवाले, खेळाडू शेखशब्बीर, शंकर आणेराव, शिवाजी गोसकुलवार, क्रीडा शिक्षक फाजीद अन्सारी, तालुका क्रीडा संयोजक अहमद लड्डा, माजी नगरसेवक शेख शादूल, इफ्तेकार अली आदी उपस्थित होते.
तामसा येथे वृक्षारोपण
हदगाव : अपंग दिनानिमित्त तामसा येथे तामसा विचार मंचकडून वृक्षारोपण करण्यात आले. माजी ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी सुरेश देशमुख यांनी झाडे भेट देऊन याकामी मदत केली. कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.
पाच डीपी द्या
हदगाव : हदगाव तालुक्यातील निवळी व निवघा येथे पाच डीपी उपलब्ध करून देण्याची मागणी बाबूराव कदम यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे केली. सध्याचे दोन्ही ३३ केव्ही ट्रान्सफाॅर्मर पैनगंगा व कयाधू नदीच्या मध्यभागी असून, मोटारपंप खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शेतीपंपाला वीजपुरवठा होत नसल्याने डीपी देण्याची मागणी कदम यांनी केली.