नांदेड जिल्ह्यातील उस्मान नगरमध्ये दगडफेक, रास्ता रोको; समाजकंटकांच्या अटकेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:34 AM2022-05-17T11:34:53+5:302022-05-17T11:44:33+5:30
आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत महामार्गावर ठिय्या दिला आहे.
नांदेड: कंधार तालुक्यातील उस्मान नगर येथे पंधरा दिवसात दुसऱ्यांदा महात्मा बसेवश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी असलेल्या बॅनरवरील फोटोची विटंबना करण्यात आली. त्यामुळे सकाळपासून गावात तणाव असून रस्त्यावर टायर जाळून वाहतूक अडविण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून दगडफेक ही करण्यात आली आहे.
आरोपींना तात्काळ अटक करून पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याशी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत महामार्गावर ठिय्या दिला आहे.
पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असतानाही पाच वेळेस समाजकंटकांनी फोटोची विटंबना केल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत आंदोलकांनी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरोपींना अटक झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला आहे.