गावागावातून होणारी पाण्याची निर्यात थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:41 AM2018-12-28T00:41:38+5:302018-12-28T00:42:00+5:30
निसर्ग व मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीत कमी-जास्त प्रमाणात पाणी आहे़ गावागावातून या वस्तूंच्या माध्यमातन शहराला पाण्याची निर्यात होते़ हे पाणी आता गावातच थांबविण्याची आवश्यकता आहे़
नांदेड : निसर्ग व मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीत कमी-जास्त प्रमाणात पाणी आहे़ गावागावातून या वस्तूंच्या माध्यमातन शहराला पाण्याची निर्यात होते़ हे पाणी आता गावातच थांबविण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी आपआपले गाव जलसाक्षर करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचा संकल्प नांदेड येथे पार पडलेल्या पहिल्या जलसाक्षरता कार्यशाळेत करण्यात आला़
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी आणि जलदूत यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली़ जलसाक्षर समाज निर्मितीत जलव्यवस्थापन हाच पाणीटंचाईवर शाश्वत पर्याय आहे़ ही बाब जलत्ज्ज्ञांच्या लक्षात आल्याने राज्य शासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशात जलसाक्षरता केंद्राची स्थापना केली आहे़ या केंद्राच्या वतीने पहिली कार्यशाळा नांदेड येथे पार पडली़ या कार्यशाळेला जलयोद्धा विभागीय जलनायकासह १० जिल्हा जलनायक, १६० जलदूत आणि ३० जलकर्मींची उपस्थिती होती़ पहिल्या सत्रात जलक्षेत्रातील आव्हाने, जलव्यवस्थापनाची गरज, जलसाक्षरता म्हणजे काय, तसेच पाण्याचा ताळेबंद, संकल्पना, महत्त्व व पद्धत यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले़ लोकहिताचे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी जिल्हा प्रशासन असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले़ यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक सुमंत पांडे आणि वाल्मी येथील जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ़राजेश पुराणिक यांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ पाण्याचा प्रत्येक थेंब नियोजनपूर्वक वापरला पाहिजे असे सुमंत पांडे म्हणाले़ आपला वर्तमानकाळ व भविष्यकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी भूपृष्ठ जलसाठ्याबरोबरच भूजलसाठ्यांचे देखील पुनर्भरण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली़ तर डॉ़ पुराणिक यांनी पाण्याच्या वापरातून सर्व पातळीवरील लोकांचे समान पातळीत समृद्धी होणे म्हणजेच शाश्वत जलव्यवस्थापन असल्याचे सांगितले़ कार्यशाळेला जलसाक्षरता समितीचे सचिव एम़ एम़ कहाळेकर, जलतज्ज्ञ प्रा़डॉ़ परमेश्वर पौळ, प्रा़डॉ़बालाजी कोंपलवार, जलनायक दीपक मोरताळे, पाणी फाऊंडेशनचे प्रतिनिधी इंद्रजीत पाटील, नागदरवाडीचे जलनायक बाबुराव केंद्रे, शेंबोली गावचे सरपंच जलनायक बाळासाहेब देशमुख, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख आदींनीही मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन अपर्णा सावळे व राजेश होनुले यांनी केले. आभार कैैलास येसगे, प्रा़डॉ़राजेश कोटलवार, निवृत्ती जोगपेठे यांनी मानले़ कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रमेश कदम, रमीजराज अल्लाखान, उज्ज्वला होटकर, नाजिया सौदागर, स्वप्निल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
टंचाईवर जलव्यवस्थापन हाच पर्याय
पाणीटंचाईचे चटके आत गाववाड्यापासून महानगरांना सोसावे लागत आहेत़ या पार्श्वभूमीवर शाश्वत जलव्यवस्थापनासाठी मानव जलसाक्षर असणे आवश्यक आहे़ जलसाक्षर समाज निर्मितीत जलव्यवस्थापन हाच पाणीटंचाईवर शाश्वत पर्याय असल्याने जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून जनजागृती सुरू करण्यात आली आहे़ आपल्या वाट्यास आलेले पाणी मर्यादित आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे़ याबाबतची माहिती तसेच प्रबोधन या जलसाक्षरता केंद्राच्या वतीने करण्यात येणार असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले़